IMD Alert Vidarbha
चंद्रपूर : पूर्व विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस (दि. 26 ते 29 सप्टेंबर) पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने जाहीर केला आहे. बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या भागात ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यासह अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला. चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासून गुरुवारी सकाळपर्यंत जोरदार पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केल्यामुळे गुरुवारी जिल्ह्यातील शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. संध्याकाळनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यां-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली.
आधीच प्रकल्प व तलाव पूर्ण भरले असल्याने सांडव्यातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ झाली आहे. त्यामुळे खालच्या गावांमध्ये सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. हलक्या धानाचे निसवणीचे दिवस सुरू असताना पावसाने शेतकऱ्यांना अडचणीत भर टाकली आहे. निसवणीला आलेल्या पिकांवर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम 29 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. त्यामुळे दरम्यान नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.