Woman killed by Tiger Chandrapur Pudhari
चंद्रपूर

Tiger Attack Chandrapur | मोहफुल वेचण्यासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही-खैरी महसुली शिवारातील घटनेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Woman killed by Tiger Chandrapur

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही-खैरी महसुली शिवारात मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर पट्टेवार वाघाने हल्ला करून ठार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.१३) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मानव-वन्यप्राणी संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाल्याचे चित्र आहे.

सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथील रहिवासी वच्छला इश्वर वाडगुरे (वय ६५) या महिला सोमवारी (दि.) सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास गुंजेवाही-खैरी महसुली शिवारात मोहफुल वेचण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत आणखी तीन जण देखील होते. सकाळी अंदाजे ८.३० वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या पट्टेवार वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला.

वाघाने महिलेच्या मानेवर झडप घालून तिला ओढत नेले. तिच्यासोबत असलेल्या अन्य लोकांनी आरडाओरडा करून वाघाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत वच्छला वाडगुरे यांचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले व महिलेचा शोध घेतला. यानंतर वनविभागाला कळविण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली बोरावार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी मृतदेह सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

घटनेनंतर परिसरात पुन्हा अशी दुर्घटना घडू नये यासाठी वनविभागाने तत्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत. संबंधित भागात पिंजरे लावण्यात आले असून ६ ट्रॅप कॅमेरे आणि १ लाईव्ह कॅमेरा बसविण्यात आला आहे. तसेच ये-जा करण्याचे मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.मृतकाच्या कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून २५ हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली बोरावार यांनी दिली.

गुंजेवाही वनक्षेत्रात मागील १५ ते २० दिवसांत वाघाच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. याच परिसरापासून सुमारे ६ ते ७ किमी अंतरावरील मरेगाव येथे काही दिवसांपूर्वी बळीराम आत्राम यांचाही वाघाने बळी घेतला होता.

संपूर्ण गाव दहशतीत असल्यामुळे गावाभोवती सुरक्षित कुंपण उभारावे, सौर दिवे बसवावेत आणि वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी पंचायत समिती उपसभापती विरेंद्र जयस्वाल यांनी प्रशासनाकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT