

Collector Vasumana Pant Hospital Inspection
चंद्रपूर : जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सांभाळताच नुतन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी विविध विभागांच्या आढावा बैठकीचा तसेच प्रत्यक्ष भेटीचा सपाटा लावला आहे. गुरुवारी गॅस एजन्सीला अकस्मिकपणे भेट दिल्यानंतर त्यांनी शुक्रवारी (दि. 10) जिल्हा सामान्य् रुग्णालय आणि कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन परिसराची पाहणी केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, डॉ. निवृत्ती जिवने, प्रभारी तहसीलदार ओंकार ठाकरे आदी उपस्थित होते.
रुग्णालयातील अंतर्गत तसेच बाह्य परिसरात नियमितपणे स्वच्छता ठेवावी, असे सांगून जिल्हाधिकारी वसुमना पंत म्हणाल्या, रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, कॅटींगची उत्तम व्यवस्था असावी. तसेच निर्माणाधीन असलेले सुलभ शौच्छालयाचे काम त्वरीत पूर्ण करून नागरिकांसाठी ते उपलब्ध करून द्यावे. बाह्य रुग्ण विभागात रांगेत असलेल्या रुग्णांना बसण्यासाठी बेंचेसची व्यवस्था करावी. जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रात विविध तपासणी कक्ष असल्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांना त्याचा लाभ झाला पाहिजे. येथील डॉक्टर्स आणि स्टाफ नवजात बालकांची चांगली काळजी घेतली असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी त्यांनी उपस्थित रुग्णांशी संवाद साधून तुमच्या बाळाला काय झाले आहे. वरचे जेवण करतो का, अशी आस्थेने विचारपूस केली. तसेच सीटी स्कॅनसाठी दररोज किती रुग्ण येतात, जेवणाची सुविधा कशी आहे, बालरुग्ण कक्षात किती बेड आहे, सर्पदंशाचे किती रुग्ण येतात आदींबाबत माहिती विचारली. यावेळी अधिष्ठाता डॉ. कांबळे यांनी सांगितले की, दररोज बाह्यरुग्णांची नोंदणी (ओपीडी) 1200 ते 1500 असते. तसेच भरती रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा दिल्या जातात.
जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आपात्कालीन कक्ष, सोनोग्राफी व एक्स – रे कक्ष, अतिदक्षता विभाग, बालरुग्ण कक्ष, नवजात बालकांचे अतिदक्षता कक्ष, ऑपरेशन थेटर, पोषण व पुनर्वसन केंद्र, जिल्हा शीघ्र अतिदक्षता कक्षातील मानसिक विकार तपासणी कक्ष, दृष्टीदोष तपासणी कक्ष, भौतिकोपचार विभाग, श्रवणदोष तपासणी कक्ष, ज्ञानेंद्रिय एकात्मिक विकास कक्ष, दंत विभाग आणि नर्सिंग कॉलेजला भेट देऊन पाहणी केली.
जिल्हाधिकारी पंत यांनी बल्लारपूर मार्गावरील निर्माणाधीन मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा भेट दिली. या नवीन परिसरात कोणकोणते काम प्रलंबित आहे व कोणत्या यंत्रणा सदर काम करीत आहे, याबाबत माहिती जाणून घेतली. तसेच महाविद्यालयाच्या प्रलंबित कामांविषयी लवकरच एक आढावा बैठक घेण्यात येईल, जेणेकरून नवीन परिसरात रुग्णालय स्थलांतरीत करणे सोयीचे होईल, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.