Warora Tanker Fire File Photo
चंद्रपूर

Chandrapur News: वरोराजवळ इंधन टँकरचा भीषण अग्नितांडव; ढाबा आणि चारचाकी-दुचाकी वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी

नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील वरोरा शहराजवळ मालू पेट्रोल पंपासमोर गुरुवारी मध्यरात्री पेट्रोल-डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरला भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील वरोरा शहराजवळ मालू पेट्रोल पंपासमोर गुरुवारी मध्यरात्री पेट्रोल-डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरला भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केले. या दुर्घटनेत टँकर पूर्णतः जळून खाक झाला असून, रस्त्यालगत असलेल्या ढाब्याचे तसेच तेथे उभ्या असलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले.

एमएच ३४ बीझेड ४०१९ क्रमांकाचा हा टँकर नागपूर येथील बोरखेडी डेपोतून चंद्रपूरच्या दिशेने जात होता. टँकरमध्ये पेट्रोल आणि डिझेल असल्याने आग वेगाने पसरली. इंधन रस्त्यावर सांडल्यामुळे आगीची तीव्रता अधिकच वाढली. आकाशात उठणाऱ्या आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

विशेष म्हणजे, घटनास्थळाच्या एका बाजूला भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप व गॅस स्टेशन, तर दुसऱ्या बाजूला रेल्वे मार्ग असल्याने परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली होती. आग पेट्रोल पंपापर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे आग नियंत्रणात आणण्यात आली आणि संभाव्य अनर्थ टळला.

या आगीत दत्तू झाडे यांच्या ढाब्याचे मोठे नुकसान झाले असून, ढाब्याजवळील चारचाकी व दुचाकी वाहने जळून खाक झाली. सुदैवाने टँकर चालक सुखरूप असून, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. दरम्यान, आगीमुळे नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. शुक्रवारी सकाळीही चंद्रपूरकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. त्यानंतर जळालेला टँकर बाजूला करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT