चंद्रपूर शहरातील एका कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची काही क्षणांसाठी भेट झाली. Pudhari News
चंद्रपूर

Maharashtra politics :"आपण दोघेही वार…आपल्यापैकी एक वार मुख्यमंत्री झाला पाहिजे"; वडेट्टीवारांचा मुनगंटीवारांना मिश्किल सल्ला

दोन्‍ही नेत्‍यांमधील ‘मन की बात’ मोबाईल कॅमेऱ्यात कैद

पुढारी वृत्तसेवा

Vijay Wadettiwar and Sudhir Mungantiwarshared lighthearted moment

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपुरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यात झालेल्या एका मिश्किल संवादाने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. ‘आपण दोघेही वार आहोत… आपल्यापैकी एक वार मुख्यमंत्री झाला पाहिजे,’ असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्याशी हस्तांदोलन करताना केलेला संवाद मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला. दोन्ही नेत्यांमधील अनौपचारिक भेटीतला हा मिश्किल संवाद आता राजकीय चर्चेचा विषय ठरत असून, त्यातील विनोद आणि राजकीय सूचकता यांचीच चंद्रपुरात चर्चा रंगू लागली आहे.

बदकम्मा महोत्सवात झाली नेत्‍यांची भेट

चंद्रपूर शहरातील रयतवारी कॉलरी परिसरात तेलुगू भाषिक समाजाच्या वतीने बदकम्मा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रम आटोपून ते बाहेर पडत असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार तेथे दाखल झाले. यावेळी दोन्ही नेत्यांची काही क्षणांसाठी भेट झाली.महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन अनुभवी आणि प्रभावशाली नेते आमनेसामने आल्यानंतर औपचारिक अभिवादनापुरती ही भेट मर्यादित राहिली नाही. विजय वडेट्टीवार यांनी हसतमुखाने सुधीर मुनगंटीवार यांच्याशी हस्तांदोलन केले आणि त्यांच्याशी मिश्किल संवाद साधला. याच वेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा संदर्भ देत केलेले विधान उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.

‘वार’ या शब्दातून राजकीय टोलेबाजी?

विजय वडेट्टीवार यांनी ‘आपण दोघेही वार आहोत’ असे म्हणत पुढे ‘आपल्यापैकी एक वार मुख्यमंत्री झाला पाहिजे’, अशी टिप्पणी केली. त्यांच्या या विधानात विनोदाची झालर असली, तरी त्यातून राजकीय अर्थ काढला जात आहे. वडेट्टीवार आणि मुनगंटीवार या दोन्ही आडनावांतील ‘वार’ या समान शब्दाचा संदर्भ घेत त्यांनी केलेली ही टिप्पणी राजकीयदृष्ट्या लक्षवेधी ठरली. विजय वडेट्टीवार यांच्या या मिश्किल शुभेच्छांना सुधीर मुनगंटीवार यांनीही हसत आणि दिलखुलासपणे प्रतिसाद दिला. पक्षीय विचारधारा वेगवेगळ्या असल्या, तरी वैयक्तिक संवादातील सहजता आणि राजकीय नेत्यांमधील मैत्रीपूर्ण संबंध या प्रसंगातून दिसून आले.

मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला मिळाला नवा संदर्भ

महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपद हा नेहमीच चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय राहिला आहे. अशा पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजप या दोन वेगवेगळ्या पक्षांतील नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उल्लेख असलेला हा संवाद घडल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अर्थात, वडेट्टीवार यांचे हे विधान मिश्किल संवादाच्या स्वरूपात करण्यात आले असून, त्यातून कोणताही औपचारिक राजकीय दावा नाही. मात्र, राजकारणात शब्दांना अनेक अर्थ असतात. त्यामुळे या छोट्याशा संवादाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगण्याची शक्यता आहे. दोन भिन्न पक्षांतील नेत्यांमध्ये झालेल्या या सहज भेटीने राजकीय मतभेदांपलीकडील संवादाचे दर्शन घडवले, तर दुसरीकडे ‘आपल्यापैकी एक वार मुख्यमंत्री झाला पाहिजे’ या विधानाने चर्चेला रंजक वळण दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT