US - Iran War  file photo
चंद्रपूर

US - Iran War | दुबईमध्ये मध्ये अडकलेल्या चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांची मायदेशी परतण्यासाठी आर्त हाक

जबेल पोर्ट परिसरात युद्धजन्य परिस्थिती; पालकांची केंद्र सरकारकडे तातडीच्या मदतीची विनंती

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : दुबईतील युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील दोन विद्यार्थी – श्रावणी धाबेकर आणि आश्रय तायडे – हे सध्या दुबईच्या जबेल पोर्ट परिसरात अडकले असून, त्यांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी त्यांच्या पालकांनी केंद्र सरकारकडे तातडीची मदत मागितली आहे. परिसरात सुरू असलेल्या मिसाईल हल्ल्यांचे आवाज आणि स्फोटांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, विमानतळ बंद असल्याने विद्यार्थ्यांना परतीचा मार्ग उपलब्ध नाही, अशी माहिती आश्रयचे वडील संजय तायडे यांनी दिली आहे.

युद्धजन्य परिस्थितीमुळे भीतीचे वातावरण

दुबईतील जबेल पोर्ट परिसरात सध्या तणावपूर्ण परिस्थिती असल्याचे विद्यार्थ्यांनी आपल्या व्हिडिओ संदेशातून सांगितले आहे. “युद्ध किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. सतत मिसाईल आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. आम्ही सर्वजण दहशतीखाली आहोत,” असे त्यांनी नमूद केले आहे. एअरपोर्ट बंद असल्यामुळे भारतात परतण्याचे सर्व मार्ग सध्या बंद झाले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार सुरक्षित ठिकाणी थांबण्याशिवाय विद्यार्थ्यांकडे पर्याय उरलेला नाही.

पालकांची केंद्र सरकारकडे धाव

आश्रय तायडे यांचे वडील संजय तायडे यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे की, युद्धजन्य भागातून त्यांच्या मुलांसह इतर भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या मायदेशी आणण्यासाठी विशेष मोहिम राबवावी. “आमची मुले परदेशात अडकली आहेत. दररोज स्फोटांचे आवाज ऐकून ते भीतीत आहेत. एअरपोर्ट बंद असल्याने परत येणे शक्य नाही. केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून त्यांना सुरक्षितपणे भारतात आणावे,” अशी भावनिक विनंती त्यांनी केली.

विद्यार्थ्यांची व्हिडिओद्वारे मदतीची याचना

श्रावणी धाबेकर आणि आश्रय तायडे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करत भारत सरकारकडे मदतीची विनंती केली आहे. “आम्हाला मायदेशी परतायचे आहे. येथे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कृपया आमच्यासाठी मदतीचा हात पुढे करा,” अशी आर्त विनंती त्यांनी केली आहे.

जिल्ह्यातूनही मदतीची अपेक्षा

या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात चिंता व्यक्त होत आहे. स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधींनीही या प्रकरणात लक्ष घालून केंद्र सरकारशी संपर्क साधावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना लवकरात लवकर मायदेशी परत आणण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT