चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तासमीकरणात ठाकरे गटाची शिवसेना निर्णायक ठरत असताना, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना महत्त्वाचा राजकीय फ्री-हॅन्ड दिल्याने चर्चेला नवे वळण मिळाले आहे. ‘जो पक्ष सन्मानाने सहकार्य करेल, त्याच्यासोबत सत्ता स्थापन करा आणि अंतिम निर्णय स्थानिक पातळीवर घ्या’ असा स्पष्ट संदेश दिल्याने, सेनेचा कल कोणत्या दिशेने जाणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
या भूमिकेमुळे काँग्रेस आणि भाजप दोघांवरही दबाव वाढला असून, सत्तास्थापनेत ठाकरे सेनेचे वजन अधिकच वाढले आहे.चंद्रपूर महानगरपालिकेत सत्तास्थापनेसंदर्भातील हालचाली निर्णायक टप्प्यावर पोहोचल्या असून, ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. बहुमताचा आकडा कोणत्याही पक्षाकडे नसल्याने ठाकरे सेना आणि वंचित आघाडीची भूमिका सत्तास्थापनेत निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमधील ठाकरे गटाची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीचे आठ नगरसेवक तसेच दोन अपक्ष नगरसेवकांनी काही वेळापूर्वी मुंबईतील मातोश्री येथे जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांचीही उपस्थिती होती. एकूण दहा नगरसेवक या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे.
या बैठकीत चंद्रपूर महानगरपालिकेतील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना महत्त्वाचा सल्ला देत, “जो पक्ष तुम्हाला सन्मानाने सहकार्य करेल, अशा पक्षासोबतच सत्ता स्थापन करा. स्थानिक पातळीवर योग्य तो निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तुमच्याकडे आहे,” असे स्पष्टपणे सांगितले.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांना सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्येसाठी इतर पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत ठाकरे सेना–वंचित आघाडी तसेच अपक्ष नगरसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.
महापौर पदावर दावा ठोकलेल्या ठाकरे सेनेच्या भूमिकेमुळे सत्तासमीकरण अधिक गुंतागुंतीचे बनले असून, उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर स्थानिक पातळीवर कोणती दिशा ठरते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी काही तासांत किंवा दिवसांत चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेचा निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
“चंद्रपूरमध्ये एकाही पक्षाला बहुमत नाही. त्यामुळे तुमची भूमिका महत्त्वाची आहे. जो पक्ष तुम्हाला सन्मानाने सहकार्य करेल, शहराच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका घेईल, त्याच्यासोबत सत्ता स्थापन करा. स्थानिक परिस्थिती तुम्हाला जास्त चांगली माहिती आहे, त्यामुळे निर्णय स्थानिक पातळीवरच घ्या.”उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख