

चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीनंतर सत्तास्थापनेच्या राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक मुंबईत दाखल झाले आहेत. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुढील राजकीय दिशा ठरवली जाणार असल्याने, चंद्रपूर मनपातील सत्तासमीकरण निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेसाठी विविध पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक मुंबईत दाखल झाले असून, आज ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट–वंचित बहुजन आघाडी युतीला एकूण आठ जागांवर यश मिळाले आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे सहा तर वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. या आठ नगरसेवकांचा अधिकृत गट सध्या सत्तास्थापनेत निर्णायक ठरत आहे.
काल या सर्व नगरसेवकांनी अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली होती. या भेटीत चंद्रपूर मनपातील राजकीय परिस्थिती आणि सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आता मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुढील रणनीती निश्चित केली जाणार आहे.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गट महापौर पदावर ठाम असून, “जो पक्ष महापौर पद देईल, त्याच्यासोबतच आम्ही सत्तेत सहभागी होणार,” अशी स्पष्ट भूमिका ठाकरे सेनेने घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी सुरू असताना आणि भाजप बहुमतापासून दूर असताना, ठाकरे गट–वंचित आघाडीची भूमिका सत्तास्थापनेत किंगमेकर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तासमीकरण अधिक स्पष्ट होणार असल्याने, पुढील राजकीय घडामोडींंकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.