Tadoba-Andhari Tiger Reserve AI PHOTO
चंद्रपूर

Tadoba-Andhari Tiger Reserve: आईसमोर शिकारीचे धडे! आधी बछड्यांचे प्रयत्न, मग वाघिणीचा अचूक वार

Tigress hunts gaur for cubs- जुनोना परिसरातील तीन बछड्यांसह वाघिणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; पर्यटकांनी कॅमेऱ्यात कैद केला रोमांचक प्रसंग

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात वन्यजीवांच्या अनोख्या हालचालींचे दर्शन पर्यटकांना सातत्याने घडत असते. चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना परिसरात तीन बछड्यांसह एका वाघिणीने रानगव्याची केलेली शिकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. आई वाघिणीसमोरच तीन बछडे रानगव्याची शिकार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा थरारक प्रसंग पर्यटकांनी कॅमेऱ्यात कैद केला असून, त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला रानगवा उभा असताना तीन बछडे त्याच्या दिशेने दबकत जाताना दिसतात. कधी मागून, तर कधी बाजूने हल्ला करण्याचा प्रयत्न ते करतात. मात्र आकाराने मोठ्या असलेल्या रानगव्याकडून प्रतिकार होत असल्याने बछड्यांना शिकार करण्यात यश येत नाही. काही अंतरावर बसलेली वाघीण मात्र संपूर्ण हालचालींवर लक्ष ठेवून असल्याचे दिसते.

जणू काही आईसमोरच शिकारीचे धडे गिरवत असल्याप्रमाणे बछडे बराच वेळ रानगव्याभोवती फिरत राहतात. रानगवा बचावासाठी प्रतिकार करत असतानाही बछड्यांचे शिकारीचे प्रयत्न सुरूच राहतात. अखेर बछडे थकल्यानंतर वाघीण स्वतः पुढे सरसावते. बछड्यांना अन्न मिळावे यासाठी ती रानगव्यावर झडप घालते आणि त्याच्या मानेवर जोरदार प्रहार करते.

वाघिणीच्या हल्ल्यानंतर रानगवा खाली कोसळतो. त्यानंतरही तो जीव वाचविण्यासाठी धडपड करत असताना वाघीण त्याला जबड्यात पकडून ठेवते. काही वेळात रानगव्याचा प्रतिकार थांबतो आणि वाघीण शिकार करण्यात यशस्वी होते. त्यानंतर तीनही बछडे आईसोबत शिकारीजवळ येतात आणि अखेर त्यांना पोटभर अन्न मिळते.

शिकारीचे धडे देणारी ‘आई’

वाघांच्या जीवनात शिकारीचे कौशल्य पिल्लांना शिकविण्याची प्रक्रिया महत्त्वाची मानली जाते. सुरुवातीला बछडे स्वतः शिकार करण्याचा प्रयत्न करतात आणि अपयश आल्यानंतर अनुभवी वाघीण शिकार करून दाखवते. जुनोना परिसरातील हा प्रसंग त्याच नैसर्गिक प्रक्रियेचे दर्शन घडविणारा असल्याने वन्यजीवप्रेमी आणि पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

चंद्रपूर जिल्हा वाघांच्या अधिवासासाठी प्रसिद्ध असून ताडोबा परिसरात देश-विदेशातून पर्यटक वाघांसह विविध वन्यजीवांचे दर्शन घेण्यासाठी येतात. जंगलातील अशा रोमांचक घटना पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद होऊन सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जुनोना परिसरातील वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांचा हा शिकारीचा प्रसंगही वन्यजीवप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT