Chandrapur Tigress Captured in Dongargaon area
चंद्रपूर : तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला आज (दि. 12 ) डोंगरगाव नियतक्षेत्रात कक्ष क. 1360 मध्ये बेशुध्द करून जेरबंद करण्यात आले. त्यानंतर लगेच वाघिणीच्या बछड्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. वाघीण जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे.
सिंदेवाही तालुक्यात तेंदुपत्ता तोडण्याचा हंगाम सुरू असल्याने शनिवारी ( दि. १० ) मेंढामाल येथील सारिका शालीक शेंडे ( वय 55), कांता बुद्धाची चौधरी (वय ६०), शुभांगी मनोज चौधरी (वय 31) ह्या महिला तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. बराच वेळ होऊनही त्या महिला घरी परत आल्या नाही. त्यामुळे प्रथम कुटुंबीयांनी शोधाशोध केली. लगेच वन व पोलीस विभागाला माहिती देण्यात आली. वन व पोलीस विभागाचे अधिकाऱ्यांनी जंगलात शोध मोहीम राबविली. दुपारी तीन वाजताच्या सुमारास डोंगरगाव बीटातील 1355 कंपार्टमेंट मध्ये मृतदेह आढळून आला होता. विशेष म्हणजे मृतांमध्ये सासू सुनेचा समावेश आहे. या घटनेनंतर घटनास्थळी त्वरीत कॅमेरा ट्रॅप व लाईव्ह कॅमेरा लावण्यात आले. त्याआधारे, वाघाचा मागोवा घेत तिघी महिलांचा बळी घेणाऱ्या वाघाची शोध मोहीम सुरु करण्यात आली.
घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी राकेश सेपट, सहायक वनसंरक्षक एम. बी. चोपडे (प्रादे. व वन्यजीव) ब्रम्हपुरी वनविभाग, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, सशस्त्र पोलिस दल अजय मराठे, बायोलॉजीस्ट राकेश अहुजा हजर झाले. अजय मराठे यांनी डोंगरगाव नियतक्षेत्रात कक्ष क. 1360 मध्ये अचूक निशाना साधून वाघिनीला बेशुध्द करून जेरबंद केले. वाघिणीची उत्तरीय तपासणी सुरू आहे. वाघिणीच्या बछड्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. लवकरच बछडे ताब्यात घेण्यात येतील, असा विश्वास वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सिंदेवाही वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहायक एन. टी. गडपायले, क्षेत्र सहायक एस. बी. उसेंडी, क्षेत्र सहायक पी. एस. मानकर, क्षेत्र सहायक के. डी. मसराम, वनपाल वाय. एम. चौके, वनपाल डी. आर. पेंदोर, वनरक्षक ओ. व्ही. चहांदे, सिंदेवाही परिक्षेत्रातील वनरक्षक, PRT सदस्य, वन मजुरांनी वाघिणीला जेरबंद करण्यासाठी सहकार्य केले.