

चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील वनसडी वनक्षेत्र अंतर्गत निजामगोंदी येथील एका शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला तब्बल सहा तास रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बिबट्या निसर्ग मुक्त झाला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यूसाठी परत परिश्रम घेतले.
मध्य चांदा वन विभागाच्या वनसडी वनपरिक्षेत्र अंतर्गत निजामगोंदी नियतवनक्षेत्र लागून असलेल्या एका शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती गुरुवारी(दि.17) सायंकाळी गस्तीवर असलेल्या वनसडी येथील वन कर्मचाऱ्यांना मिळाली. लगेच वनपरिक्षेत्राधिकारी अधिकारी, क्षेत्र सहायक, वनरक्षक, वनमजुर घटनास्थळी दाखल झाले. रात्रीची वेळ असल्याने बिबट्याला बाहेर काढणे धोक्याचे होते. मात्र तब्बल सहा तास रेस्क्यू करण्यात आले. अथक प्रयत्नानंतर रात्री 1 वाजताच्या सुमारास बिबट्याला शिळीच्या आधारे बाहेर काढण्यात आले. विहिरी बाहेर काढलेला बिबट्या जंगलाचे दिशेने सुखरूप पळून गेला. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि: श्वास घेतला.
ही रेस्क्यू मोहीम उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एन जी केळवदकर, वनसडी क्षेत्र सहायक दिनकर चामलवार, कोरपना क्षेत्र सहायक एन.आर. धात्रक, वनरक्षक आर.जी. कुनघाटकर, करिश्मा पाचभाई, एस डी तांदुलकर, साई मेश्राम, निखिल गेडाम, डी.जी.मडावी, व्यंकटी जेल्लेवाड, एन.आर. गेडाम, अनिल कोल्हे इतर वनमजुर, गावकरी यांनी यशस्वीपणे पार पाडली.