चिमूर वनपरिक्षेत्रातील बोरीगाव रोडी परिसरात अस्वल-पिल्लाच्या मृत्यूच्या तपासात वाघाच्या शिकारीचे गूढ उकलले! संशयित आरोपीसह वन कर्मचारी. Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Tiger Poaching : चंद्रपूरमधील चिमूर वनपरिक्षेत्रात अस्वल-पिल्लाच्या मृत्यूच्या तपासात वाघाच्या शिकारीचे गूढ उकलले!

जिवंत विद्युत प्रवाह सोडून वाघाची शिकार; नखे, सुळे आणि हाड विक्रीसाठी काढल्याचा धक्कादायक खुलासा

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Tiger Poaching

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा:   शेतातील पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी तारांच्या कुंपणात सोडलेल्या जिवंत विद्युत प्रवाहाने मादी अस्वल आणि तिच्या चार ते पाच महिन्यांच्या पिल्लाचा बळी घेतला. मात्र, या घटनेच्या तपासाला वेगळेच वळण मिळाले असून, याच शेतात दोन वर्षांपूर्वी जिवंत विद्युत प्रवाह सोडून वाघाची शिकार केल्याचे धक्कादायक प्रकरण चिमूर वनपरिक्षेत्रातील बोरीगाव रोडी येथे उघडकीस आले आहे. एवढेच नव्हे, तर पुरलेल्या वाघाचे सहा नखे, दोन सुळे आणि एक हाड विक्रीच्या उद्देशाने काढून नेल्याची कबुली आरोपीने दिल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी आरोपी फकीरा संभाजी रणदिवे याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २७ नोव्हेंबरपर्यंत वनकोठडी सुनावली आहे.

अस्वल आणि तिचे पिल्लू मृतावस्थेत आढळले

वनविभागाच्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास चिमूर वनपरिक्षेत्रातील बोरीगाव रोडी परिसरात वनरक्षक गस्तीवर असताना शेत सर्वे क्रमांक १० मध्ये मादी अस्वल आणि तिचे पिल्लू मृतावस्थेत आढळले.

तारांच्या कुंपणात सोडला होता विद्युत प्रवाह

घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणीदरम्यान शेताभोवतीच्या तारांच्या कुंपणात जिवंत विद्युत प्रवाह सोडल्याचे आढळून आले. याच विद्युत प्रवाहाचा धक्का लागून अस्वल आणि तिच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. मृत मादी अस्वलाचे वय अंदाजे पाच ते सहा वर्षे, तर पिल्लाचे वय चार ते पाच महिने असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित शेत तीन वर्षांच्या कराराने घेण्यात आल्याची माहितीही वनविभागाने दिली.

अस्वलाच्या मृत्यूच्या तपासातून वाघाच्या शिकारीचा पर्दाफाश

या घटनेप्रकरणी वनविभागाने संशयित फकीरा संभाजी रणदिवे, रा. तळोधी (नाईक), याची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने सुमारे दोन वर्षांपूर्वी याच शेतात तारांच्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडून वाघाची शिकार केल्याचे सांगितल्याची माहिती वनविभागाने दिली. वाघाचा मृतदेह शेतातील खड्ड्यात पुरल्याचेही त्याने कबूल केले. त्यामुळे अस्वलाच्या मृत्यूच्या तपासातून दोन वर्षांपूर्वीच्या वाघाच्या शिकारीचे गूढ उकलले आहे.

वाघाचे अवशेष विक्रीसाठी काढले

या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे जुलै २०२६ मध्ये आरोपीने पुरलेल्या वाघाचे सहा नखे, दोन सुळे आणि एक हाड विक्रीच्या उद्देशाने काढून आपल्या घरी नेल्याचे तपासात समोर आले आहे. वन्यजीवांच्या अवयवांची विक्री करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडल्याचे वनविभागाने प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे. या खुलाशामुळे परिसरातील वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आरोपीला अटक; पुढील तपास सुरू

वनविभागाने आरोपीला अटक करून वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कारवाई केली. त्याला चिमूर येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वनकोठडी सुनावली. ब्रह्मपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी एस. आर. यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

वन्यजीवांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. अशा परिस्थितीत पिकांच्या संरक्षणाच्या नावाखाली शेतांभोवती जिवंत विद्युत प्रवाह सोडणे वन्यजीवांसाठी जीवघेणे ठरत आहे. एका घटनेत अस्वल आणि तिच्या पिल्लाचा मृत्यू झाला, तर त्याच तपासातून वाघाच्या शिकारीचे जुने प्रकरण उघडकीस आल्‍याने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्‍हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT