Wildlife Attack
चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील नवेगाव खुर्द गावात गुरे राखण्यासाठी गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी समोर आली आहे. या हल्ल्यात जयपाल लक्ष्मण उईके (वय 46) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपाल उईके हे नेहमीप्रमाणे आपल्या गायींना मेंडकीजवळील रामपुरी जंगल शिवारात (कक्ष क्र. 154) चारण्यासाठी गेले होते. दाट झुडपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक त्यांच्या दिशेने हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे जयपाल उईके जमिनीवर कोसळले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली.
हल्ल्यात त्यांच्या पोटाच्या आतड्या बाहेर पडल्या असून पाठीवर, हातावर आणि मानेवरही गंभीर जखमा झाल्या आहेत. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने ब्रम्हपुरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने सायंकाळी उपचारासाठी नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
विशेष म्हणजे, याच रामपुरी जंगल परिसरात दोन वर्षांपूर्वीही जयपाल उईके यांच्यावर वाघाने हल्ला केला होता. त्या वेळी ते थोडक्यात बचावले होते, मात्र किरकोळ जखमाही झाल्या होत्या. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
या घटनेमुळे वनविभागाची जबाबदारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रामपुरी परिसरात वाघाचा वावर असल्याची वारंवार माहिती मिळत असतानाही गुराख्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना का करण्यात आलेल्या नाहीत, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
या भागात वाघांचे सातत्याने दर्शन आणि हल्ल्याच्या घटनांमुळे स्थानिक शेतकरी व गुराख्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वनविभागाने या भागात तातडीने गस्त वाढवावी, वाघाचा हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसवावेत आणि स्थानिकांना योग्य खबरदारीबाबत मार्गदर्शन करावं, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.