जिवतीच्या तहसीलदार रूपाली मोगरकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. Pudhari
चंद्रपूर

Chandrapur News : तेलंगणा वनविभागाने सांगणापूरमधील उभ्या पिकांवर चालवला ट्रॅक्टर; पिके उद्ध्वस्त

जिवतीच्या तहसीलदार रूपाली मोगरकर यांची घटनास्थळी पाहणी; सीमावादामुळे शेतकरी हवालदिल

रणजित गायकवाड

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील संगणापूर गावात तेलंगणा वनविभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता शेतात ट्रॅक्टर फिरवून उभी पिके उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला असून, जिवतीच्या तहसीलदार रूपाली मोगरकर यांनी बुधवारी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

शेतामध्ये ट्रॅक्टर फिरवून उभी पिके केली नष्ट

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील संगणापूर येथे तेलंगणा वनविभागाच्या कारवाईमुळे शेतकरी संकटात सापडल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ८ जुलै रोजी तेलंगणा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी पोलिस बंदोबस्तासह गावात दाखल झाले. कोणतीही नोटीस, सूचना किंवा पूर्वकल्पना न देता त्यांनी शेतामध्ये ट्रॅक्टर फिरवून उभी पिके नष्ट केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याचा दावा करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी न्यायाची मागणी

घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनाकडे धाव घेत न्यायाची मागणी केली. त्यानंतर बुधवारी (१५ जुलै) सकाळी साडेअकराच्या सुमारास जिवतीच्या तहसीलदार श्रीमती रूपाली मोगरकर यांनी संगणापूर येथे भेट देऊन नुकसानग्रस्त शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी महिला व शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या तसेच संपूर्ण प्रकरण वरिष्ठांकडे मांडून योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

तिसर्‍या पिढीचा त्याच जमिनीवर उदरनिर्वाह

शेतकऱ्यांनी तहसीलदारांसमोर आपली बाजू मांडताना सांगितले की, त्यांचे पूर्वज गेली ६० ते ७० वर्षांपासून या जमिनीवर शेती करत आहेत. आज तिसरी पिढीही त्याच जमिनीवर उदरनिर्वाह करत आहे. काही शेतकऱ्यांकडे महाराष्ट्र शासनाकडून मिळालेले सातबारा उतारे असून त्यावर आधारित पीककर्ज तसेच विविध शासकीय योजनांचाही लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले.याशिवाय, तेलंगणा महसूल विभागानेही २००१ ते २०१३ या कालावधीत संबंधित शेतकऱ्यांना पट्टे व इतर महसुली कागदपत्रे दिल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. मात्र, वनविभागाचे अधिकारी हे सर्व कागदपत्रे अमान्य ठरवत असल्याचा आरोप करण्यात आला. "ही कागदपत्रे बोगस आहेत, ती जाळून टाका, आम्हाला काही दाखवू नका," अशा शब्दांत अधिकाऱ्यांनी धमकावल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केला.

कायमस्वरूपी तोडगा काढण्‍याची मागणी

सध्या नैसर्गिक संकटामुळे शेती आधीच अडचणीत असताना वनविभागाच्या कारवाईमुळे शेतकरी पूर्णपणे खचल्याची भावना व्यक्त करण्यात आली. नुकसानभरपाईसह कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा आम्हाला जगण्यापेक्षा विष प्राशन करण्याची किंवा गोळ्या घालून ठार मारण्याची परवानगी द्यावी, अशी संतप्त भावना काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.यावेळी बालाजी पांढरे, लक्ष्मण किसन नरोटे, नामदेव सेगडे, खंडू काटमोडे, रमेश नारायण पोले आदी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली. न्याय न मिळाल्यास शेतकऱ्यांच्या जीवितास काही बरे-वाईट झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या जमिनींच्या मालकीचा प्रश्नाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते सुग्रीव गोतावळे, तिरुपती पोले, गणेश शेटकर, सिताराम मडावी, माधव डोईफोडे, अमोल कांबळे, प्रदीप काळे, नागोराव देवकते, काशिनाथ कोंमले, गोविंद गोरे, पांडुरंग होडबे, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने महिला व शेतकरी उपस्थित होते.सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांच्या जमिनींच्या मालकीचा प्रश्न आणि वनविभागाच्या कारवाईचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते आणि शेतकऱ्यांना न्याय मिळतो का, याकडे संपूर्ण जिवती तालुक्यासह सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT