महालगाव बिटातील जंगलात वाघाने एका बछड्याला ठार केल्याची घटना समोर आली आहे.  (Pudhari Photo)
चंद्रपूर

Chandrapur Tiger News | ताडोबातील २ वाघांची प्रादेशिक वनात एन्ट्री: झुंजीत बछडा ठार; इतर २ बछड्यांच्या जिवाला धोका

प्रादेशिक वनविकास महामंडळाच्या महालगाव बिटातील घटना

पुढारी वृत्तसेवा

Tadoba Tiger Clash Tiger Cub Killed

चंद्रपूर : ताडोबाच्या बफर झोनला लागून असलेल्या प्रादेशिक वनविकास महामंडळाच्या चिमुर तालुक्यातील महालगाव बिटातील जंगलात (कंपाटमेंट नंबर 21) मध्ये वाघाने एका बछड्याला ठार केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून प्रादेशिक जंगलातून पर्यटन सफारी आटोपून येत असताना काही पर्यटकांच्या ही घटना लक्षात आली.

ताडोबा व्यतिरिक्त चिमुर तालुक्यात असलेल्या प्रादेशिक वनविकास महामंडळाच्या जंगलात पर्यटन सफारी सुरू आहे. ताडोबा अभयारण्याच्या बफर झोनला लागून असलेल्या चिमुर तालुक्यातील खडसंगी वनपरिक्षेत्रातील महालगाव बिटात काही दिवसांपासून तीन बछड्यासह एक वाघिण भ्रमंती करताना वनविभागाला आढळून येत आहे. वनविभागाच्या ट्रॅप कॅमेरामध्ये ती दिसून आली आहे. ती कुठून आली हे वनविभागालाच माहित नाही, परंतु पर्यटकांना मात्र तिचे दर्शन होत असताना काल सायंकाळी महालगाव बिटातील कंपाटमेंट क्रं. 21 मध्ये उरकुडपार तलावाजवळ दु:खद घटना समोर आली.

वाघासोबत एका सात महिन्याच्या मादी बछड्याची झुंज झाली. यामध्ये वाघाने बछड्याला ठिकठिकाणी केलेल्या गंभीर दुखापतीत मादी बछडा ठार झाला. वाघ आणि बछड्यामध्ये झालेल्या झुंजीनंतर वाघ त्या बछड्याला तोंडातून नेत असताना काही पर्यटकांना दिसून आले. त्यामुळे या घटनेची माहिती सर्वत्र पसरली. वनविभागाला सदर घटनेची माहिती झाल्यानंतर विभागीय व्यवस्थापनक मोटकर, वनपरिक्षेत्राधिकारी सोनुरकर, वनपरिक्षेत्राधिकारी देऊरकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. परिसर आणि मृतदेहाची पाहणी केल्यानंतर वाघाच्या झुंजीत बछड्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. विशेष म्हणजे या प्रादेशिक वनात ताडोबातील दोन वाघ आल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकीच एकाने त्या बछड्याला ठार केल्याचा संशय वनविभागाला आहे.

उमरेड कऱ्हांडमधून बछड्यांसह जान्हवी नावाची वाघिण आल्याची चर्चा

चिमूर तालुक्यातील प्रादेशिक वनविकास मंडळाच्या जंगलात काल ज्या बछड्याचा वाघासोबत झालेल्या झुंजीत मृत्यू झाला. ती वाघिण काही दिवांपासून या जंगलात नव्यानेच आली आहे. तिचे वनविभाग व पर्यटकांनाही दर्शन झाले आहे. परंतु ती कुठून आली हे सांगणे कठिण असल्याचे वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु सध्या जी चर्चा सुरू आहे, त्यानुसार उमरेड कऱ्हांडला अभयरण्यातून तीन बछाड्यासह ती वाघिण आल्याची चर्चा सुरू आहे. जान्हवी नावाची ती वाघिण असल्याचे सांगितले जात आहे. याच प्रादेशिक वनाला ताडोबा अभयारण्याचा बफर झोन लागून आहे. त्यामुळे त्या ठिकाणावरून दोन वाघाची प्रादेशिक वनात एन्ट्री झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे कलुवा नावाच्या वाघाने त्या बछड्याला ठार केल्याची चर्चा आहे. परंतु नावाबाबत मात्र अधिकाऱ्यांनी सांगण्यास नकार दिला. प्रादेशिक वनातील एन्ट्री झालेल्या त्या वाघांनी काल एका बछड्याला ठार केल्यानंतर त्या अन्य दोन बछड्यांच्या जिवाला तर धोका नाही ना अशी चर्चा पर्यटकांमध्ये सुरू आहे. जीव धोक्यात असल्याचेही बोलल्या जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT