चंद्रपूर : वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी आणि पावसाळ्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमधील पर्यटन आजपासून (1 जुलै) तीन महिने बंद करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना कोअर झोनमध्ये प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वन्यप्रेमींमध्ये विशेष लोकप्रिय असून, येथे दरवर्षी देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. मात्र पावसाळा आणि वन्यजीवांच्या प्रजनन काळाच्या पार्श्वभूमीवर 1 जुलैपासून 30 सप्टेंबरपर्यंत कोअर झोन पर्यटनासाठी बंद ठेवण्यात येतो.
या काळात पावसामुळे अंतर्गत रस्त्यांवर चिखल व पाणी साचण्याची शक्यता असते, त्यामुळे वाहनांना अडचणी निर्माण होतात. यामुळे दुर्घटनांचा धोका वाढतो. शिवाय, वाघ व इतर वन्यप्राण्यांच्या प्रजनन प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठीही ही बंदी उपयुक्त ठरते.
कोअर झोनमध्ये पर्यटनावर निर्बंध असले तरी बफर झोनमधील काही भागांमध्ये मर्यादित स्वरूपात पर्यटन सुरू राहण्याची शक्यता असते. मात्र पर्यटकांनी कोअर झोनमध्ये जाण्याचे नियोजन पुढील तीन महिने टाळावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.