Kanha National Park tiger death incident
चंद्रपूर : मध्यप्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पात कॅनाईन डिस्टेम्पर व्हायरस (CDV) मुळे वाघीण आणि तिच्या चार बछड्यांचा झालेला मृत्यू देशातील वनविभागासाठी मोठा इशारा ठरला आहे. या घटनेनंतर चंद्रपुरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनानेही सतर्क भूमिका घेत वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी व्यापक उपाययोजना सुरू केल्या आहेत. विशेषतः ताडोबातील वाघांना या घातक विषाणूची लागण होऊ नये, यासाठी बफर क्षेत्रातील गावांमध्ये युद्धपातळीवर मोहीम राबविण्यात येत आहे.
कॅनाईन डिस्टेम्पर व्हायरस हा प्रामुख्याने कुत्रे, लांडगे, कोल्हे यांसारख्या श्वानवर्गीय प्राण्यांमध्ये आढळणारा संसर्गजन्य विषाणू आहे. संक्रमित प्राण्यांच्या संपर्कातून तो वाघ, बिबट्या आणि इतर मांसाहारी वन्यप्राण्यांमध्ये पसरू शकतो. मध्यप्रदेशातील घटनेनंतर राष्ट्रीय स्तरावर सतर्कता वाढविण्यात आली असून ताडोबा व्यवस्थापनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक तीव्र केल्या आहेत.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रालगत असलेल्या 95 गावांमध्ये सुमारे अडीच हजार भटकी व मोकाट कुत्री शोधण्यात आली आहेत. या सर्व कुत्र्यांचे रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यात येत असून हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत जवळपास नव्वद टक्के गावांमधील कुत्र्यांना लस देण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. याशिवाय संशयास्पद कुत्र्यांच्या मुखातील स्राव आणि रक्तनमुने गोळा करून प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले जात आहेत. संभाव्य संसर्गाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाने विशेष निरीक्षण यंत्रणा तयार केली आहे.
ताडोबा व्यवस्थापनाने जंगलातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र विशेष पथकेही स्थापन केली आहेत. ही पथके जंगलातील विविध भागांमध्ये भ्रमण करून रानकुत्रे, तृणभक्षी प्राणी आणि इतर वन्यजीवांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवत आहेत. वाघांच्या वर्तनात कोणताही असामान्य बदल दिसल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी आणि प्रतिसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
ताडोबा परिसरात अनेक गावे जंगलालगत असल्याने भटक्या कुत्र्यांचा जंगलात मुक्त वावर असतो. त्यामुळे वाघ आणि इतर वन्यप्राण्यांच्या संपर्कात येण्याचा धोका अधिक वाढतो. हा धोका लक्षात घेऊन गावागावांत जनजागृती मोहीमही सुरू करण्यात आली आहे. गावकऱ्यांनी संशयास्पद अवस्थेतील कुत्र्यांची माहिती वनविभागाला द्यावी, तसेच पाळीव कुत्र्यांचे नियमित लसीकरण करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ताडोबातील ही मोहीम महत्त्वाची मानली जात असून, भविष्यात संसर्गजन्य रोगांपासून वाघ आणि इतर वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी ती प्रभावी ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
ताडोबातील वाघांना कोणत्याही प्रकारच्या विषाणूजन्य संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. बफर क्षेत्रातील कुत्र्यांचे लसीकरण, नमुना तपासणी आणि जंगलातील सतत निरीक्षण सुरू असून प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. -- डॉ. प्रभुनाथ शुक्ला, क्षेत्र संचालक (ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प)