Tadoba-Andhari Tiger Reserve  
चंद्रपूर

Tadoba-Andhari Tiger Reserve | ताडोबा सफारीत 'स्थानिक कोटा'चा गैरवापर करणाऱ्या रॅकेटवर वन विभागाचा प्रहार

दुर्गापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील (TATR) सफारी आरक्षणामध्ये बनावट आधारकार्डचा वापर करून शासनाची आणि स्थानिक पर्यटकांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा वन विभागाने पर्दाफाश केला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत, आज मंगळवारी (दिनांक 30 डिसेंबर २०२५) रोजी ताडोबा प्रशासनातर्फे दुर्गापूर पोलीस ठाण्यात संबंधित एजंट्स आणि व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा फौजदारी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांकरिता क्रुझर सफारीमध्ये काही जागा राखीव (Local Quota) असतात. या सवलतीचा गैरफायदा घेण्यासाठी दिनांक १९ डिसेंबर२०२५ रोजी काही व्यक्तींनी ५ वेगवेगळ्या आयडीवरून एकूण ७ क्रुझरची सफारी तिकिटे बुक केली होती. ख्रिसमसच्या सुट्टीत दिनांक २५ डिसेंबर२०२५ रोजी सकाळच्या सफारीदरम्यान मोहर्ली (कोअर) प्रवेशद्वारावर वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) आणि  अविनाश गणवीर, मोहर्ली पर्यटनप्रवेशद्वार व्यवस्थापक यांनी पर्यटकांच्या कागदपत्रांची काटेकोर तपासणी केली.

यावेळी एकूण २३ पर्यटकांपैकी ९ पर्यटकांच्या आधारकार्डमधील फोटो आणि माहितीमध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आले. तसेच उर्वरित १० पर्यटकांनी ओळखपत्र दाखविण्यास नकार दिला. प्राथमिक चौकशीत हे स्पष्ट झाले की, बुकिंग करताना स्थानिक लोकांचे आधार क्रमांक वापरले गेले, परंतु प्रत्यक्ष आधारकार्डवर बाहेरील पर्यटकांचे फोटो लावून संगणकीय फेरफार करण्यात आला होता.

कोलारा गेट परिसरातही काहीजण पर्यटकांकडून अतिरिक्त पैसे घेऊन त्यांना सफारीचे आमिष दाखवत असल्याचे समोर आले आहे. स्थानिक नावाने बुकिंग करून ऐनवेळी ते रद्द करणे आणि त्याऐवजी त्यांच्याकडील पर्यटकांना पाठवणे, असा प्रकार उघडकीस आला आहे.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, आनंद रेड्डी येल्लु, उपसंचालक (कोअर) यांच्या अहवालानुसार आणि क्षेत्र संचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ला यांच्या आदेशान्वये, वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण) यांनी आज दुर्गापूर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पोलीस तपासात यामागील सूत्रधार आणि यात सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई अपेक्षित आहे.

"ताडोबाच्या पर्यटन व्यवस्थेत पारदर्शकता राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. बनावट कागदपत्रे तयार करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. पर्यटकांनी अशा कोणत्याही दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये. यापुढे सर्व प्रवेशद्वारांवर ओळखपत्रांची अत्यंत कडक तपासणी केली जाईल आणि दोषी आढळल्यास पर्यटकांवरही सह-आरोपी म्हणून कारवाई केली जाईल."
डॉ. प्रभू नाथ शुक्ला (भा.व.से.) वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक,ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT