चंद्रपूर: रात्री पाळीच्या सुमारास मोटारसायकलने कामावर जात असलेल्या एका कोल वॉशरीज पर्यवेक्षकाच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.४) रात्री साडेनऊच्या सुमारास घुग्घूस ताडाळी मार्गावर घडली. नवीन पोंगंटी ( वय ३८) असे मृतकाचे नाव आहे. या घटनेनंतर आज सोमवारी त्यांच्या कुटुंबियांनी अपघातास जबादार असलेल्या एका ट्रक कंपनीच्या कार्यालयासमोर मृतदेह ठेवून धरणे दिले.
रविवारी रात्री सुमारे ९:३० वाजता, नवीन त्यांच्या नाइट ड्यूटीवर जात होते. ते मोटरसायकलवर विमला सायडिंगकडे जात असताना, घुग्घूस-ताडाळी मार्गावरील मुरसा गावाजवळ एक ब्रेकडाउन झालेली ट्रक अंधारात उभी होती. त्या वाहनाला मोटारसायलची भीषण धडक झाली. यामध्ये नवीन यांना डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
आज दुपारी सुमारे २:१५ वाजता, नवीन यांचे कुटुंबीय त्यांचे पार्थिव घेऊन सप्रा ट्रान्सपोर्टच्या कार्यालयात पोहोचले आणि कंपनीकडून ५० लाख मोबदल्याची मागणी करू लागले. कंपनीच्या व्यवस्थापकांमध्ये गणेश आणि जायसवाल यांच्याशी चर्चा सुरू झाली. दुपार पर्यंत आंदोलकांच्या मागणीवर तोडगा निघालेला नव्हता. नवीन यांचे पार्थिव गेल्या तीन तासांपासून एम्ब्युलन्समध्ये ठेवले होते आणि कुटुंबीयांनी कार्यालयाबाहेर प्रचंड संताप व्यक्त केला. त्यामुळे कंपनी परिसरात तणाव निर्माण झाला. लगेच स्थानिक पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी येऊन परिस्थती नियंत्रित केली.
नवीन घुग्घूस येथील सुभाष नगरमध्ये राहत होते आणि ते त्यांच्या कुटुंबाचे एकमेव कमावणारे सदस्य होते. त्यांच्या निधनाने पत्नी, मुलगा, आई-वडील आणि एक लहान भाऊ यांना धक्का बसला आहे. ही घटना भद्रावती पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पार्थिव शरीर पोस्टमॉर्टमसाठी भद्रावती सरकारी रुग्णालयात नेण्यात आले होते, परंतु रात्री उशिरा झाल्यामुळे आजच पोस्टमॉर्टम करण्यात आले.