Chandrapur Municipal Corporation
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला असतानाच भाजप नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महापौरपदाबाबत ठाम भूमिका मांडली आहे. “महापौर भाजपचाच होईल, अन्यथा भाजप विरोधात बसेल,” असे स्पष्ट करत त्यांनी संवादातून मार्ग निघेल, असा विश्वास व्यक्त केला असून, काही काँग्रेस नगरसेवकांशी चर्चाही झाल्याचे सूचक विधान केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या त्रिशंकू परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सत्तास्थापनेबाबत आत्मविश्वास व्यक्त केला. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे सध्या पेच निर्माण झाल्याची चर्चा असली, तरी “चंद्रपुरात फारसा पेच आहे, असे मला वाटत नाही,” असे सांगत त्यांनी संवादातून तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला.
“सध्या संक्रांतीचे दिवस आहेत. संक्रांतीला पेच सुटत असतात. चंद्रपुरात संवाद होईल आणि त्यातून प्रश्न सुटेल. झाला तर भाजपचाच महापौर होईल, नाहीतर आम्ही विरोधात बसू,” असे स्पष्ट शब्दांत मुनगंटीवार यांनी सांगितले. शहराच्या विकासासाठी जो कोणी भाजपसोबत येईल व सहकार्य करेल, त्याला सोबत घेतले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
याच वेळी त्यांनी सूचक विधान करत काही काँग्रेस नगरसेवकांशी चर्चाही झाल्याचे सांगितले. मात्र, याबाबत अधिक तपशील देण्याचे त्यांनी टाळले. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसमधून फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात असून, चंद्रपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सोबत युतीचे संकेतही मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. स्पष्ट बहुमत नसलेल्या परिस्थितीत विविध पक्षांशी संवाद सुरू असून, सत्तास्थापनेसाठी सर्व पर्याय खुले असल्याचे मुनगंटीवार यांच्या वक्तव्यातून दिसून येते.
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चेबाबत विचारले असता मुनगंटीवार म्हणाले, “अशी चर्चा झाल्याचे मी ऐकले आहे. मात्र त्यात किती तथ्य आहे, याची खात्री करण्यासाठी काही नेत्यांशी बोललो. त्यांनाही याबाबत ठोस माहिती नाही.” त्यामुळे या चर्चांवर त्यांनी सध्या तरी कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. नागपूरचे भाजप नेते संदीप जोशी यांच्या राजकारणातून निवृत्तीच्या चर्चांवर बोलण्यास मुनगंटीवार यांनी नकार दिला. “हा नागपूरचा विषय आहे. त्यावर तेथील प्रमुख नेतेच बोलतील,” असे सांगत त्यांनी हा विषय टाळला.
एकूणच चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेबाबत भाजप आक्रमक भूमिकेत असून, महापौरपदावर ठाम दावा कायम आहे. काही काँग्रेस नगरसेवकांशी झालेल्या चर्चेच्या सूचक विधानामुळे आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.