

BJP vs Shiv Sena UBT
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या निकालानंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेचा पेच कायम असून, महापौरपदावर भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी दावा केल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. संख्याबळात पिछाडीवर असतानाही भाजपने महापौरपदावर दावा ठोकला असताना, ‘किंगमेकर’ ठरलेल्या शिवसेनेनेही थेट महापौरपदाची मागणी केल्याने सत्तासमीकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस–जन विकास सेना युतीला सर्वाधिक 30 जागा मिळाल्या असून भाजपचे 24 नगरसेवक निवडून आले आहेत. याशिवाय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे 6, वंचित बहुजन आघाडीचे 2, बहुजन समाज पार्टीचा 1, एमआयएमचा 1 तर 2 अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत. एकूण संख्याबळ पाहता कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेसाठी लहान पक्ष आणि अपक्ष नगरसेवकांचे महत्त्व वाढले आहे.
मागील महानगरपालिकेत भाजपचे 36 नगरसेवक निवडून येत स्पष्ट बहुमताची सत्ता होती. मात्र, यावेळी संख्या घटूनही भाजपने सत्ता स्थापनेचा दावा कायम ठेवला आहे. भाजप नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेससोबत युती न केलेले पक्ष आणि अपक्ष नगरसेवक भाजपसोबत येण्यास तयार असल्याचा दावा केला होता. केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे शहराच्या विकासासाठी अधिक निधी उपलब्ध करून देता येईल, हा विश्वास नगरसेवकांच्या मनात असल्याचे त्यांनी सांगितले होते.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती या निवडणुकीत विशेष ठरली आहे. या युतीतून एकूण 8 नगरसेवक निवडून आले असून, त्यामध्ये शिवसेनेचे 6 नगरसेवक आहेत. काँग्रेससोबत शिवसेनेची युती न झाल्याने सध्याच्या सत्तासमीकरणात शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरली आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने थेट महापौरपदाची मागणी केल्याने सत्तेचा पेच अधिकच वाढला आहे. या बाबत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी दुजोरा देत, स्पष्ट बहुमत नसलेल्या परिस्थितीत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असून महापौरपदाची मागणी योग्य असल्याचे सांगितले आहे.
सध्या ‘किंगमेकर’ ठरलेल्या शिवसेनेच्या भूमिकेकडे भाजप, काँग्रेस तसेच अपक्ष आणि इतर लहान पक्षांचे लक्ष लागले आहे. शिवसेना कोणासोबत जाते, यावरच चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तेचे चित्र स्पष्ट होणार असून, आगामी काही दिवसांत घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.