चंद्रपूर : चिमूर पोलिस ठाण्यात वाळूने भरलेला हायवा ट्रक तब्बल दहा दिवस कोणतीही कारवाई न करता बेवारस अवस्थेत उभा राहिला आणि त्याची नोंदही स्टेशन डायरी, पंचनामा वा जप्ती रजिस्टरमध्ये करण्यात आली नाही. या गंभीर प्रकरणाची पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी, दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. चिमुरात हायवा ट्रक पकडणारे ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO) राकेश जाधव यांची या प्रकरणात चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. चौकशीची जबाबदारी अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्यावर सोपविली आहे.
ब्रह्मपुरी व चिमूर तालुक्यांत काही महिन्यांपासून बिनदिक्कतपणे वाळूतस्करी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर २८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री गस्तीवर असताना उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांनी हायवा (क्रमांक MH-36 AA-9833) हा वाळूने भरलेला ट्रक चिमूर येथील हजारे पेट्रोल पंपासमोर पकडला. ट्रकमध्ये बेकायदेशीररीत्या आणलेल्या वाळू असल्याची खात्री झाल्यानंतर जाधव यांनी हा ट्रक चिमूर पोलिस ठाण्यात सुपूर्द केला. परंतु धक्कादायक बाब म्हणजे दहा दिवस ठाण्यात उभा असतानाही ना जप्ती पंचनामा, ना फिर्याद, ना स्टेशन डायरीमध्ये नोंद अशी एकही प्रक्रिया करण्यात आली नाही.
त्यामुळे हायवा दहा दिवस कोणत्याही पोलिस नोंदीशिवाय ठाण्यातच बेवारस उभा होता. या प्रकरणावरून अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अखेर चिमूरचे ठाणेदार दिनेश लबडे यांनी अखेर लेखी अहवाल एसडीपीओ कार्यालयामार्फत पोलिस अधीक्षकांकडे पाठवला.
यानंतरच, ८ नोव्हेंबर रोजी (शनिवार) अखेर गुन्हा दाखल झाला.हायवा रेती ट्रक चौकशीत ट्रकमालक वनपाल गभणे यांनी हा ट्रक भंडारा जिल्ह्यातील विवेक राजू दोनाडकर याला विकल्याचा दावा केला आहे. दोनाडकर यांच्या चौकशीत हा ट्रक वाळूतस्करीमध्ये वापरला जात असल्याचे स्पष्ट झाले. इतकेच नव्हे तर ट्रक पकडल्यानंतर काही आर्थिक व्यवहार झाल्याची कबुली दोनाडकर यांनी चौकशीत दिल्याची माहिती समोर येत आहे. या संशयित आर्थिक व्यवहारामुळेच ट्रकची नोंद थांबवण्यात आली असावी, अशी चर्चा पोलिस विभागात सुरू आहे.