

चंद्रपूर : तळोधी बा परिसरातील खेड्यावर वर्तमानपत्र वितरणासाठी जात असताना मधमाशांच्या हल्ल्यात पेपर वितरक जखमी झाल्याची घटना आज दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी साडेसात वाजता कोजबि चक येथे घडली. जखमी व्यक्तीचे नाव नानाजी किसन उईके असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नानाजी उईके हे नेहमीप्रमाणे सकाळी तळोधी येथून पेपर घेऊन शेजारील खेड्यांत वितरणासाठी निघाले होते. कोजबि येथील राईस मिलजवळून जात असताना जवळच्या झाडावर असलेले मधमाशांचे मोठे पोळे अचानक उडाले आणि संतप्त झालेल्या मधमाशांनी त्यांच्या अंगावर झुंडीने हल्ला केला.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे नानाजी उईके यांची प्रकृती गंभीर झाली. ते रस्त्याच्या कडेला पडल्याचे स्थानिकांनी पाहताच घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी तत्परतेने त्यांना तळोधी येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलवले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यावर उपचार सुरू असून तब्येत स्थिर व सुधारत आहे.
या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी संबंधित ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून मधमाशांचे पोळे सुरक्षितरीत्या हटवण्याची मागणीही स्थानिकांनी केली आहे.