चंद्रपूर

चंद्रपूर : अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात सरपंच संघटनेचा एल्गार

दिनेश चोरगे

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : कोरपना तालुक्यातील आवारपुर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी अंतर्गत काही दत्तक गावे येतात. येथील दत्तक गावातील १० ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी सिमेंट कंपनी विरोधात आज (दि.१३) धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे.

आंदोलनात कंपनीच्या दत्तक गावातील सरपंच, उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलकांनी मागण्या संदर्भात अल्ट्राटेक सिमेंट कंपनीला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला असून त्यानंतर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. उद्या मंगळवारी (दि.१४) आंदोलनाला सामजिक कार्यकर्त्या मेघा पाटकर भेट देणार आहेत.

कंपनीच्या सीएसआर निधीमधून ग्रामपंचायतींना आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येत नसल्याचा आरोप ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे. सोबतच ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात न घेता निधी परस्पर खर्च केला जात आहे .  कंत्राटी कामगारांच्या बोनसमध्ये वाढ करावी, स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा, कंपनीने माणिकगड येथे होणारी लाईम स्टोनची वाहतूक तात्काळ थांबवावी, आय टी आय  विद्यार्थ्यांना अप्रेंटिस करता जागा भरती करावी, गाव शिवारातील पांदन रस्त्याची दुरुस्ती कंपनीमार्फत करण्यात यावी, दत्तक घेतलेल्या गावांमध्ये अनेक युवक सुशिक्षित आहे, अशा प्रशिक्षण झालेल्या युवकांना ट्रेनिंग म्हणून घेण्यात यावे. सिमेंट कारखान्याच्या वाढत्या प्रदूषणामुळे दत्तक गावामध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांना कॅन्सर, अपेंडिक्स, हर्निया, त्वचेचे रोग असे विविध आजार होत आहेत तसेच अनेकांनी जीव सुद्धा गमावलेले आहेत. त्यामूळे वाढते प्रदूषण बंद करावे. कंपनीकडून कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. मात्र, परिसरातील नागरिकांच्या जीवाशी कंपनी खेळ करीत आहे. ही समस्या त्वरित निकाली काढावी, सी एस आर फंड च्या नावाखाली कंपनी इतर जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठानंना व अधिकारी लोकांना यातील फंडाचा हिस्सा वाटप करीत आहे तो प्रकार त्वरित बंद करावा, अशा अनेक मागण्यांसाठी सरपंच संघटनाने आक्रमक पवित्र घेतला आहे.

दत्तक गावातील नांदा, बीबी, आवरपूर, हिरापूर, सांगोडा, नोकारी, पालगाव तळोदी, बाखर्डी, भोयेगाव गावातील सरपंच उसरपंच सदस्य अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या माध्यमातून सदर आंदोलन करीत आहेत.  या आंदोलनाला दत्तक गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT