चंद्रपूर : नागभिड तालुक्यातील गोविंदपूर परिसरातील सापेपार शेतशिवारात एक सहा वर्षाचा नर जातीचा दुर्मिक चौसिंगा गुरूवारी सकाळी मृतावस्थेत आढळून आला आहे. तळोधी बा. वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांन घटनास्थळी जावून पंचनामा केला. त्यानंतर मृत चौसिंगाचे त्याच ठिकाणी दफन करण्यात आले.
गोविंदपूर परिसरातील सापेपार शेतशिवारात हरिण प्रजातीचा प्राणी मृत अवस्थेत असल्याची माहिती स्वाब संस्थेचे नितीन भेंडाळे यांना मिळाली. त्यांनी तळोधी (बा.) वन परिक्षेत्र कार्यालयाला माहिती दिली. क्षेत्र सहाय्यक अरविंद मने, क्षेत्र सहाय्यक आर. एस. गायकवाड, वनरक्षक श्रीरामे, वनरक्षक चुधरी, स्वाब संस्थेचे यश कायरकर, जिवेश सयाम, नितीन भेंडाळे घटनास्थळी दाखल झाले.
हा दुर्मिळ मानल्या जाणारा हरीण कुळातील चौशिंगा आहे. तो नर जातीचा असून अंदाजे सहा वर्षे वयाचा आहे. त्याच्या मानेवरील दाताच्या व नखांच्या जखमेवरून त्याला बिबट्याने पकडले असावे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. जीव वाचविण्याच्या प्रयत्नात धावपळ करताना झाडाला आदळून त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.