चंद्रपूर ः वर्षभरापूर्वी दाखल केलेल्या बोगस मतदार नोंदणी व मतचोरीच्या गुन्ह्याची चर्चा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर पुन्हा रंगली आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघातील 6,861 बोगस मतदार नोंदणीचा प्रकार प्रशासनाने मान्य केला असला, तरी अद्याप याप्रकरणी पोलिस तपासात कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही. बोगस मतदार नोंदणी झाल्याचे मान्य करत प्रशासनाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले असून, त्यांच्या सतर्कतेमुळेच या नावांची वगळणी करण्यात आल्याचा दावा केला आहे. काँग्रेसकडून मात्र तपासात झालेल्या विलंबावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
देशाचे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरी, मतदारांची नावे वगळणे, तसेच नव्याने बोगस नावे समाविष्ट केल्याचे आरोप करत पत्रकार परिषद घेतल्यानंतर चंद्रपूर जिल्हा प्रशासनात हालचाली सुरू झाल्या आहेत. राजुरा विधानसभा मतदारसंघात तब्बल 6 हजार 861 बोगस मतदार नोंदणी झाल्याचे मान्य करत प्रशासनाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले असून, त्यांच्या सतर्कतेमुळेच या नावांची वगळणी करण्यात आल्याचा दावा केला आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत 6,861 बोगस मतदार नोंदणी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. प्रारूप मतदारयादी 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध झाली, तर अंतिम यादी 30 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर झाली. त्यानंतर 1 सप्टेंबरपासून निरंतर मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली.
माजी आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांनी, 2024 च्या निवडणुकीत मला 3 हजार 54 मतांनी पराभूत केले. या मतदारसंघात बाहेरच्या राज्यातील नावेही मतदारयादीत आढळली होती. आमच्या तक्रारीनंतर काही नावे वगळली गेली; तरीही 11 हजार बोगस नावे मतदारयादीत राहिली. पोलिसांना विचारले असता ते म्हणतात की, आयपी अॅड्रेस माहिती निवडणूक आयोगाकडून न दिल्याने तपास करणे कठीण झाले आहे. हा प्रकार केवळ राजुराच नाही, तर राज्यातील इतर मतदारसंघांतही झाला असण्याची शक्यता आहे.