Tadoba Andhari Tiger Reserve | ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात 'फुलतोय मोरांचा पिसारा' Pudhari Photo
चंद्रपूर

Tadoba Andhari Tiger Reserve | ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात 'फुलतोय मोरांचा पिसारा'

मोरांच्या संख्येत चारपटीने वाढ

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : वाघांच्या हमखास दर्शनाचे स्थळ म्हणून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहे. ताडोबाची देशात नव्हे तर सातासमुद्रापार ओळख आहे. पर्यटक वारंवार येथे येत असतात. ताडोबा वाघांसोबतच विविध जातीच्या वन्यप्राण्यांच्या पर्यटनाचे केंद्र बनत आहे. कारण आता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोरांचा पिसारा फुलत आहे.

बुध्द पौर्णिमेच्या रात्री पाणवटा आधारित झालेल्या वन्यप्राणी गणनेत मागील वर्षीपेक्षा यावेळी चारपटीने मोरांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे पिसाऱ्यांनी फुलले मोरांचे थवे पर्यटक व वन्यजीवप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. मागील वेळी बफर झोन मध्ये 97 मोरांची नोंद होती. यावेळी चारपटीने वाढून ती 551 वर गेली आहे. त्यामध्ये कोअर 450 तर बफर झोनमध्ये 101 मोरांची नोंद झाली आहे.

मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. भारत श्रीलंका व आसपासच्या देशामध्ये मोरांचे वास्तव्य आहे. नर मोर अत्यंत रंगीबेरंगी आणि भव्य पिसाऱ्यांचा असतो. मादी मोर (मोरणी) रंगाने फिकट व पिसाऱ्याविणा असतो. पंख फुलवून नाचणाऱ्या मोरांचे दृश्य अत्यंत मनमोहक आणि पर्यटक व वन्यप्रेमींना भूरळ घालणारे असते. मोर हा सर्वभक्षक आहे. किटक,साप, धान्य, फळे हा त्याचा आहार आहे. बुध्द पोर्णिमेच्या रात्री बफर झोनमध्ये राज्यातील 162 पर्यटक व कोअर झोनमध्ये ताडोबाचे अधिकाऱ्यांनी वन्यप्राणी गणना केली. त्यावेळी मोरांच्या पिसाऱ्यांनी पाणवटे फुललेले दिसले.

पाणवटा आधारीत वन्यप्राणी गणनेत दोन्ही झोनमध्ये 551 मोरांची लक्षणीय नोंद करण्यात आली. कोअर झोनमध्ये 450 तर बफर मध्ये 101 मोर आढळून आले. पळसगाव वनपरिक्षेत्रामध्ये सर्वात जास्त 48, मोहर्ली 20, मूल 19 तर खडसंगी 9, शिवणी 5 मोरांची नोंद झाली तर चंद्रपूर मध्ये एकही मोर आढळून आला नाही. परंतु कोअर झोनमध्ये मोठ्या प्रमाणात 450 मोरांची नोंद करण्यात आली आहे.विशेष म्हणजे ही आकडेवारी फक्त एकाच रात्रीच आहे. परंतु यापेक्षाही जास्त संख्येनी मोर असल्याची माहिती ताडोबाच्या सुत्रांनी दिली आहे.

मागील काही वर्षांत ताडोबामध्ये पर्यावरणीय संतुलन, अन्नसाखळीतील समतोल आणि संरक्षण उपाययोजनांमुळे मोरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. हे पक्षी जंगलात आढळणाऱ्या विविध कीटकांवर उपजीविका करत असल्याने ते पर्यावरणासाठी उपयुक्त ठरत आहेत. वन्यजीव संरक्षकही याला एक सकारात्मक संकेत मानत असून “जंगलातील जैवविविधता निरोगी असल्याने वाढ होत असल्याचे दिसून येते. मोरांची वाढलेली संख्या आणि सौंदर्य ताडोबाची नवी ओळख बनणार आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प फक्त वाघांसाठीच प्रसिद्ध नसून आता "मोरांच्या पिसाऱ्याची रंगत"ही या जंगलाचा अविभाज्य भाग बनत चालली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT