Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Politics | चंद्रपूर महापालिका स्थायी समितीच्या विलंबावरून पप्पू देशमुख यांची महापौरांवर टीकेची झोड

अधिकाराचा दुरुपयोग; चार लाख नागरिकांची माफी मागावी :  महानगर आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Municipal Corporation politics

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या गठनात झालेल्या विलंबावरून राजकीय वातावरण तापले असून, महापौर संगीता खांडेकर यांनी शहरातील नागरिकांची माफी मागावी, अशी मागणी महानगर आघाडीचे गटनेते प्रदीप उर्फ पप्पू देशमुख यांनी केली आहे. विशेष सभेत बोलताना त्यांनी आरोप केला की, कोणतेही ठोस कारण नसताना महापौरांनी आपल्या अधिकाराचा वापर करून २० फेब्रुवारीच्या सभेत स्थायी समिती सदस्यांच्या निवडीचा विषय स्थगित ठेवला. यामुळे स्थायी समिती गठीत होण्यास तब्बल एक महिन्याचा विलंब झाला असून शहरातील विकासकामांवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे.

देशमुख म्हणाले की, १० फेब्रुवारीच्या सभेत अजेंड्यानुसार सत्ताधारी पक्षातील भाजप, शिवसेना (उबाठा) – वंचित तसेच विरोधी पक्षातील काँग्रेस आणि महानगर आघाडीच्या गटनेत्यांनी स्थायी समिती सदस्यांची नावे बंद लिफाफ्यात महापौरांकडे देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र एका नगरसेवकाच्या इशाऱ्यावरून महापौरांनी हा विषय प्रलंबित ठेवला, असा आरोप त्यांनी केला. परिणामी स्थायी समिती अध्यक्षाची निवडही लांबणीवर गेली असून याचा परिणाम सुधारित अर्थसंकल्प आणि विकासकामांवर होऊ शकतो, अशीही त्यांनी चिंता व्यक्त केली.

गटनेते राजेश अडूर यांची गच्छंती करा :  संतोष लहामगे

दरम्यान, काँग्रेस पक्षातही अंतर्गत वाद उफाळून आला आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष लहामगे यांनी पक्षाचे अधिकृत गटनेते राजेश अडूर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

लहामगे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, स्थायी समितीच्या सात जागांच्या निवडीबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः गटनेते राजेश अडूर यांना दूरध्वनीवरून स्पष्ट सूचना दिल्या होत्या. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करून शहर जिल्हाध्यक्षांमार्फत अधिकृत नावेही कळविण्यात आली होती. मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष करून अडूर यांनी स्वतःच्या मर्जीतील नावे देत पक्ष नेतृत्वालाच उघड आव्हान दिल्याचा आरोप त्यांनी केला.

लहामगे यांच्या मते, हा प्रकार केवळ पदाचा गैरवापर नसून प्रदेश नेतृत्वाच्या अधिकारावर केलेले थेट आक्रमण आहे. यापूर्वीही अशाच प्रकारच्या अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसच्या हातातून महानगरपालिकेची सत्ता निसटली होती. आता पुन्हा एकदा वरिष्ठ नेत्यांच्या स्पष्ट सूचनांकडे दुर्लक्ष करून पक्षात फूट पाडण्याचे काम केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

“वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षहिताला तिलांजली देणाऱ्या प्रवृत्तींमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. अशा पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर तातडीने कठोर शिस्तभंगाची कारवाई करून निष्ठावंत नगरसेवकांना न्याय द्यावा,” अशी मागणीही त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT