चंद्रपूर : वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीच्या तडाख्याने भुईसपाट झालेल्या उन्हाळी धानपिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास नागभिड तालुक्यात बुधवारी (दि.७) पासून सुरूवात झाली. शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देऊन नुकसान भरपाईची मागणी केली होती. आंदोलनाच्या त्याच दिवशी नागभिडचे तहसीलदार प्रतापराव वाघमारे यांनी तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकांचे लेखी आदेश काढून नियुक्त्या केल्या. तालुक्यातील सर्वच १३८ गावातील नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहेत.
१ मे ला रात्री आठच्या सुमारास जोरदार वादळी-वाऱ्यासह गारपिटीने नागभिड तालुक्यातील चिंधीचक, चिंधीमाल, किटाळी बोर, मांगरूड, तळोधी (बा.) परिसरातील उश्राळमेंढा, गंगासागर हेटी, आकारपूर, सावर्ला,लखमापूर, खरकाडा,आलेवाही शेतशिवारात झोडपून काढले. गारपिटीच्या तडाख्याने उभे धानपिक भूईसपाट झाले. बांध्यामध्ये धानाचा सडा पडला. सुमारे ८० ते ९० टक्के धानपिके जमीनदोस्त झाली. त्यानंतर पुन्हा ३ मे ला सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपल्याने उरले-सुरले पिकही नष्ट झाली आहेत.
आस्मानी संकटामुळे अतोनात नुकसान झाल्याने शेकडों शेतकऱ्यांनी सोमवारी नागभीड तहसील कार्यालयावर धडक देऊन नागभिडचे तहसीलदार प्रतापराव वाघमारे यांची भेट घेतली आणि नुकसान भरपाईची मागणी केली. भयान नुकसानीचे वास्तव्य शेतकऱ्यांनी तहसीलदारांसमोर मांडले. सायंकाळी तहसीलदार वाघमारे यांनी उन्हाळी धानपिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी लेखी आदेश काढले.
नागभिड तालुक्यातील १३८ गावांचे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकांची निुयक्ती केली. तर पंचनामे वेळेत व्हावीत याकरीता कृषी व महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना तपासणी व समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. काल बुधवारपासून १ ते ४ मे या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे नुकसान झालेल्या नागभिड तालुक्यातील उन्हाळी धानपिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करण्यास सुरूवात झाली आहे. प्रमाणित कार्यपद्धतीनुसार तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक हे नुकसानग्रस्त गावातील बांधावर जावून नुकसानीचे पंचनामे करत आहेत. यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे.
नागभिड तालुक्यातील सर्व १३८ गावातील नुकसानीचे पंचनामे करून तसा अहवाल तहसीलदार वाघमारे यांना सादर करण्यात येणार आहे. पंचनामे करण्याच्या कामात निष्काळजीपणा व दुर्लक्ष न करता शेतपिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करण्याचे निर्देश तहसीलदार वाघमारे यांनी दिले आहे.