Orange alert in Chandrapur; The rain increased
चंद्रपुरात ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढला Pudhari Photo
चंद्रपूर

Chandrapur Rain : चंद्रपुरात ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढला

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा

रात्री रिमझीम असलेला पाऊस आज (शनिवार) सकाळपासून चांगलाच बरसत आहे. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट चा इशारा दिल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पूरस्थिती कमी होत असतानाच दिवसभर सुरू असलेल्या पावसाने पुन्हा पुरस्थितीची शक्यता वर्तविली जाते आहे. विशेष म्हणजे हवामान खात्याच्या अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाने शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.(Chandrapur Rain)

चंद्रपूर जिल्ह्यात संततधार सुरू असल्याने नदी, नाले, तलाव, तंडूब भरले आहेत. मागील काही दिवसांपासून सर्वत्र पाऊस असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीची नासधुस झाली आहे. पावसामुळे रोवणी प्रभावीत झाली आहे. झालेली रोवणी पुराच्या पाण्यात सडत आहेत. तर धान पऱ्ह्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक दिवसांपर्यंत पाणी शेतात भरून असल्याने पिके कुजत आहेत. पाऊस उसंत घेऊन पिकांची स्थिती सुधारेल अशी आशा बळीराजाला असतानाच दिवसागणीक हवामान खात्याकडून मिळणाऱ्या रेड, ऑरेंज, येलो अलर्ट च्या इशाऱ्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.(Chandrapur Rain)

काल (शुक्रवार) हवामान खात्याने शनिवारकरीता ऑरेंज तर पुढचे 30 जुलै पर्यंत येलो अलर्टचा इशारा दिला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अतिमुसळधार पावसात जिवीत वा वित्तहाणी होऊ नये, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी घोषीत केली. शुक्रवारी दिवसा पावसाने उसंत घेतली होती. तर रात्री रिमझीम सुरू होता. आज सकाळी नऊ वाजेपर्यंत पाऊस रिमझीमच होता. त्यानंतर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे.(Chandrapur Rain)

विशेष म्हणजे धान उत्पादक क्षेत्रातील ब्रम्हपुरी, नागभिड, सिंदेवाही, चिमूर, मुल, सावली आदी ठिकाणी चांगला पाऊस कोसळत आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वीही रेड अलर्टच्या दिवशी याच धान पट्यात पाऊस धो- धो कोसळला. काल शुक्रवारी पावसाने उसंत घेतल्याने दोन दिवसांपूर्वीची जिल्ह्यातील पूरस्थिती कमी व्हायला लागली होती. जिल्ह्यातील सर्व मार्ग सुरू झालेत.(Chandrapur Rain)

दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांची पाण्याची पातळी धोक्याखाली आली होती. मात्र आज शनिवारी संततधार पावसाने पुन्हा पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ब्रम्हपुरी, नागभिड, सिंदेवाही, चिमूर, मुल, सावली आदी ठिकाणी सकाळपासून पाऊस चांगलाच कोसळला. तसेच अन्य भागातही पाऊस चांगलाच कोसळत असल्याची माहिती आहे. वारंवार येणाऱ्या पुरस्थितीमुळे नागरिकांचे बेहाल होत आहेत. तर पिके खराब होत आहेत. सकाळ पासून सुरू झालेला पाऊस दुपारीही सुरूच होता. सायंकाळी साडेचार वाजतापर्यंत पावसाचा जोर कमी झालेला नव्हता. असाच पाऊस सुरू राहिला तर जिल्ह्यात सर्व नदी नाले दुथडी वाहून पुरस्थिती निर्माण होऊ शकते.(Chandrapur Rain)

SCROLL FOR NEXT