चंद्रपूर : ताडोबात अधिवास आणि वाघिणीवरील हक्काच्या लढाईतून दोन वाघांमध्ये झालेल्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू तर दुसरा जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ताडोबाच्या व्याघ्रप्रकल्पाच्या खडसंगी वनपरिक्षेत्रात घटना सोमवारी (दि.१२) बुध्द पौर्णिमेच्या रात्री साडेसात ते आठच्या सुमारास घडली. जखमी झालेला वाघ हा छोटा मटका असल्याचे सांगितले जात आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रामदेगी क्षेत्रात छोटा मटका, नयनताराचे आर्कषण आहे. नयनतारा ही वाघीण तिच्या निळ्या डोळ्यांमुळे पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. त्यामुळे तिला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. काही वर्षांपासून या क्षेत्रात छोट्या मटका नावाच्या वाघाचे वास्तव्य आहे. त्यामुळे तो अन्य वाघांना या क्षेत्रात येऊ देत नाही. आलेच तर त्यांची तढाई ठरलेली आहे. यापूर्वीही येथे येणाऱ्या नवीन वाघांसोबत त्याची लढाई झाली आहे. काल सोमवारी बुध्द पौर्णिमेचा दिवस असल्याने कोअर व बफर झोन वन्यप्राणी गणनेची वनविभागाची जय्यत तयारी सुरू होती. सायंकाळी पर्यटक व वनाधिकारी वन्यप्राणी गणना करण्यासाठी मचानीवर सज्ज झाले होते. यादरम्यान ताडोबाच्या खडसंगी वनपरिक्षेत्रातील बफर झोनमध्ये कक्ष क्रमांक ६३ मध्ये साडेसात ते आठच्या सुमारास ब्रम्हा आणि छोटा मटका यांच्यात झुंज सुरू झाली. यामध्ये ब्रम्हा या वाघाचा मृत्यू झाला आणि छोटा मटका हा वाघ गंभीर जखमी झाला. छोटा मटका हा वाघ बाहेर आला तेव्हा त्याचे तोंड पूर्णपणे रक्ताने माखलेले होते. त्याचा पायाला गंभीर जखमा आढळून आल्या. सफारी आटोपून येणाऱ्या काही पर्यटकांना ही झुंज आढळून आल्याने त्यांनी स्थानिक वन कर्मचाऱ्यांना माहिती दिली. लगेच वरिष्ठांना माहिती देण्यात आली. तातडीने वरीष्ठ घटनास्थळी पोहचले. तेव्हा एका वाघाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.
सहायक वनसंरक्षक साईतन्मय दुबे, खडसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत, क्षेत्र सहाय्यक हटवार, वनरक्षक लोखंडे आदी वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन मंगळवारी (दि.१३) सकाळी वाघाचा मृत्देह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. छोटा मटका या वाघाने आतापर्यंत तीन वाघांना ठार केले आहे. या अगोदर त्यांने अर्जुनी गावातील शेत शिवार परिसरात एक वाघ तर मागील वर्षी बजरंग या ताडोबातील नावाजलेल्या वाघाला ठार केले होते.