

Tiger rescue operation in Nakadongri forest area
भंडारा: वनपरिक्षेत्र नाकाडोंगरी अंतर्गत डोंगरी, चांदमारा व कुरमुडा या गावांच्या सीमेलगतच्या शेतशिवारात व मानवी वस्तीजवळ सतत वावर असणाऱ्या अंदाजे २.५ ते ३ वर्ष वयाच्या वाघाला मंगळवारी (दि.२९) यशस्वीरित्या जेरबंद करण्यात आले. ही कारवाई शीघ्र बचाव दल भंडारा, जलद बचाव दल नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केली. ही मोहिम उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सदर वाघ मागील आठवड्यापासून गावातील पशुधनावर हल्ले करत होता. वाघाच्या सततच्या उपस्थितीमुळे परिसरातील नागरिक व पशुपालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे स्थानिकांनी वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी, (दि.२८) नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र कार्यालयात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार तांत्रिक समिती गठीत करण्यात आली. समितीने वाघ मानवी वस्तीलगत फिरत असल्याने भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन जेरबंद करण्याचा निर्णय घेतला. २९ एप्रिल रोजी मौजा कुरमुडा येथे वाघाने ठार केलेल्या शेळीच्या ठिकाणी डार्टद्वारे वाघाला बेशुद्ध करून पकडण्यात आले. नंतर वाघाची आरोग्य तपासणी डॉ. मेघराज तुलावी आणि डॉ. विठ्ठल हटवार यांनी केली.
तपासणीत वाघ सुदृढ असल्याचे निष्पन्न झाल्याने, वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीने त्याला नैसर्गिक अधिवासात पुन्हा निसर्गमुक्त करण्यात आले. या मोहिमेत सहायक वनसंरक्षक रितेश भोंगाडे, सचिन निलख, संजय मेंढे, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी अपेक्षा शेंडे, शीघ्र बचाव दल, नाकाडोंगरी, तुमसर व लेंडेझरी येथील वनकर्मचारी सहभागी होते.