No firing at Congress leader's house, says report of Deputy Director of Regional Forensic Science Laboratory
चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा
तीन महिण्यांपूर्वी 9 मार्चच्या रात्री घुग्घस काँग्रेस शहराध्यक्ष राजु रेड्डी यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटनाच संशयास्पद ठरली आहे. नागपूर येथील प्रादेशिक न्यायवैद्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा (गृह विभाग) चे उपसंचालक यांनी दिलेल्या अहवालात घुग्घूस येथे राजू रेड्डी यांचे घरी गोळीवाराची घटनाच घडली नसल्याचा स्पष्ट अभिप्राय दिला आहे. त्यामुळे तो बनाव होता का?, इतपत शंका निर्माण झाली आहे.
तीन महिण्यांपूर्वी 9 मार्चच्या रात्री घुग्घस येथे काँग्रेसचे शहराध्यक्ष राजु रेड्डी यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली होती. या भ्याड हल्ल्याची माहिती घुग्घुस मध्ये पसरताच राजु रेड्डी यांच्या समर्थकांची मोठी गर्दी त्यांच्या घराबाहेर तणावपूर्ण बनले होते. पोलिसांकडून राजू रेड्डी यांच्या घरासभोवती तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. लगेच घुग्घुस पोलिसांनी घटनास्थळी पोहचून प्रकरणाचा तपास सुरू केला. प्राथमिक तपासात गोळीबाराच्या घटनेनंतर रेड्डी यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील गॅलरीत गोळीबारात वापरलेले काडतूस आढळून आले.
या घटनेनंतर, पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली होती. त्या आधारे पोलीसांनी अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू केला होता. परंतु घुग्घुस येथे गुन्हा नोंदवून घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक टिम, बीडीडीएस पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथके, श्वान पथक, आरमोरर पथक यांनी भेट देवुन प्राथमिक चौकशी केली असता त्यावेळी सुध्दा रेड्डी यांच्या घरी पोर्चमध्ये गोळीबार झाल्याचे कोणतेही चिन्ह दिसुन आले नव्हते.
काडतुसच्या समोरील रिकामा केस आढळून आल्याने फॉरेन्सिक पुष्टी करीता सदर गुन्हयाच्या तपासाकरीता बॅलेस्टीक तज्ञांना बोलावून घटनास्थळी आढळून आलेल्या काडतुसाची रिकामे केस ई. फॉरेन्सिक तपासणी करीता पाठविण्यात आले. याबाबत सदरतज्ञांचा अहवाल मागविण्यात आला आहे. यामध्ये धक्कादायक माहितीसमोर आली आहे.
प्रादेशिक न्यायवैद्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक यांनी दिलेल्या अहवालात रेड्डी यांच्या घरी गोळीबार झाल्याच नसल्याचा स्पष्ट अभिप्राय दिला आहे. तसेच पोलिसांनी केलेल्या आजपर्यंतच्या सखोल तपासात शुध्दा रेड्डी यांच्या घराच्या ठिकाणी गोळीबार झाल्याचे निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे गोळीबार झाल्याचा बनाव तर करण्यात आला नाही ना इतपत शंका निर्माण होत आहे. या अहवालामुळे गोळीबार प्रकरणावर प्रश्नचिन्ह लागले आहे.