चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील साखरा येथे राहणारी मयुरी हरिदास सुपारे (वय २६) हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तिचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत महिलेचे वडील हरिदास सुपारे यांनी हा आत्महत्येचा प्रकार नसून हत्या असल्याचा आरोप करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मयुरी हिचा महेश गुलाब कावले याच्यासोबत मे २०२६ मध्ये प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर दोघांमध्ये कौटुंबिक वाद होत असल्याचा तसेच मयुरीला मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.
घटनेनंतर वरोरा पोलिसांनी महेश गुलाब कावले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलीस करत असून, शवविच्छेदन अहवाल, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.