Chandrapur Flood | संततधार पावसाने पूरस्थिती गंभीर; वर्धेच्या बॅकवॉटरचा चंद्रपूर शहराला विळखा

वर्धा नदीला पूर, अनेक मार्ग बंद; तेलंगणाशी संपर्क तुटला, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली
Wardha River Flood Chandrapur
Wardha River Flood Chandrapur Pudahri
Published on
Updated on

Wardha River Flood Chandrapur

चंद्रपूर : चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या संततधार मुसळधार पावसामुळे वर्धा नदीला मोठा पूर आला असून संपूर्ण जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक प्रमुख रस्ते आणि ग्रामीण संपर्कमार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वर्धा नदीच्या बॅकवॉटरचा फटका चंद्रपूर शहरालाही बसला असून अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

वर्धा नदीच्या पुरामुळे भोयेगाव–चंद्रपूर मार्गावरील भोयेगावजवळील पूल पाण्याखाली गेल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. राजुरा–बल्लारपूर मार्गावरील पुलावरही पाणी आल्याने वाहतूक थांबविण्यात आली आहे. सास्ती जवळील नाल्याला पूर आल्याने तेथील मार्ग बंद झाला असून कडोली बू. –पोळसा मार्गही वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

Wardha River Flood Chandrapur
Chandrapur Rain | चंद्रपूर जिल्ह्यात  प्रतीक्षेनंतर दमदार पाऊस; खरीप पेरण्यांना वेग येणार

गोंडपिपरी तालुक्यातील तेलंगणाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या पोळसा पुलावरून पाणी वाहू लागल्याने महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांतील थेट संपर्क तुटला आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून दोन्ही राज्यांतील प्रवाशांना मोठा फटका बसत आहे.

दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर कालपासून पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी वर्धा आणि वैनगंगा नद्यांमधील पाण्याची पातळी अद्यापही वाढलेली आहे. वर्धा नदीच्या पुरामुळे नदीकाठावरील शेकडो हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन व कापूस पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Wardha River Flood Chandrapur
Chandrapur Boy Drowns | सावली तालुक्यात तलावात बुडून ९ वर्षीय मुलाचा मृत्यू

पुराचा सर्वाधिक परिणाम चंद्रपूर शहरावर दिसून येत आहे. वर्धा नदीच्या बॅकवॉटरमुळे रहमतनगर, पठाणपुरा, सहारा पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. वर्धा नदीच्या उपनद्या असलेल्या इरई आणि झरपट नद्यांचे पाणी पुढे वाहून जाऊ शकत नसल्याने ते बॅकवॉटरच्या स्वरूपात शहराकडे वळत आहे. परिणामी अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

महानगरपालिकेच्या बचाव पथकाने तातडीने मदतकार्य सुरू करत अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. पूरग्रस्तांना शाळा आणि इतर सुरक्षित इमारतींमध्ये तात्पुरता आश्रय देण्यात आला असून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

Wardha River Flood Chandrapur
Chandrapur Burglary Case | घरफोडीप्रकरणी आरोपीला छत्तीसगडमधून जेरबंद, 3 लाखांची रोकड जप्त

दरम्यान, इरई धरणही संततधार पावसामुळे जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहे. अद्याप धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले नसले तरी पुढील काळात पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास दरवाजे उघडण्याची वेळ येऊ शकते. तसे झाल्यास चंद्रपूर शहरातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता प्रशासनाने नाकारलेली नाही.

वर्धा नदीच्या पुरामुळे चंद्रपूर तालुक्यातील अनेक ग्रामीण संपर्कमार्गही बंद झाले आहेत. पांढरकवडा–वडा, आरवट–शिवणी चोर, वडा–उसगाव, पिपरी–वेंडली, धानोरा–भोयेगाव, हिंगणाडा–मारडा, आरवट–पठाणपुरा, चोराळा–बिनबा गेट तसेच पांढरवडा–उसगाव हे मार्ग सध्या पाण्याखाली असून वाहतूक पूर्णपणे बंद आहे. जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि महानगरपालिका संयुक्तपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news