Chandrapur youth killed by lightning
चंद्रपूर : कोरपना तालुक्यात मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास आलेल्या भीषण वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठा कहर केला. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून, वीज पडून एका २५ वर्षीय युवकासह एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. अनेक घरांची टिनपत्रे उडून गेल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
वादळादरम्यान शेरज बूज येथील शेतशिवारात काम करीत असताना संयोग चंद्रकांत लोडे (वय २५) या युवकाच्या अंगावर अचानक वीज कोसळली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर गोविंदपूर येथील शेतात बांधून ठेवलेल्या विकास वामन खडसे यांच्या मालकीच्या बैलावरही वीज पडली. यात बैल जागीच दगावला.
या वादळाचा फटका कोरपना तालुक्यातील कोरपना, कन्हाळगाव, अकोला, पारडी, शेरज बूज, माथा, धोपटाळा, मांडवा, वनसडी, कोडशी बूज, कोडशी खुर्द, गोविंदपूर, रायपूर, खैरगाव, हेटी, गांधीनगर, तांबाडी, तुकडोजीनगर, पिंपरी, मेहंदी, चनई बूज, चनई खुर्द, पांडूगुडा, चोपण, जेवरा, खडकी आणि रूपापेठ आदी गावांना बसला.
वादळाचा वेग इतका प्रचंड होता की अनेक गावांमधील घरांवरील टिनपत्रे हवेत उडून गेली. तसेच शेतशिवारातील शेड, गोठे आणि तात्पुरत्या बांधकामांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेती उपयोगी साहित्य, खते, अन्नधान्य तसेच संसारोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली. काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्याने आणि पत्रे अंगावर पडल्याने नागरिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
वादळामुळे अनेक रस्त्यांवर मोठमोठी झाडे उन्मळून पडली असून, विद्युत खांब कोलमडल्याने संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. तांत्रिक बिघाडामुळे महावितरण कंपनीचेही मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय फुटपाथ विक्रेते, छोटे व्यावसायिक तसेच लग्नसमारंभ आयोजकांचीही मोठी तारांबळ उडाली.
वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका अकोला आणि पारडी या गावांना बसला. अनेक घरांचे छप्पर उडाल्याने कुटुंबीयांचे संसार अक्षरशः रस्त्यावर आले. काही नागरिकांना रात्र उघड्यावरच काढावी लागली. गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नुकसानग्रस्तांनी प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार यांनी तातडीने आपतग्रस्त गावांना भेट दिली. त्यांनी बाधित नागरिकांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले व नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. तसेच, प्रशासनातील अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याच्या सूचना दिल्या.