चंद्रपूर: शिकारीच्या बेतात असलेल्या एका बिबट्याचा गावाशेजारील विहिरीमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी (२८मे) ला मूल तालुक्यातील आगडी येथे उघडकीस आली आहे. बिबट हा पाच वर्षाचा नर जातीचा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिकारीच्या बेतात असलेला बिबट काल मंगळवारी रात्रीच्या सुमारास मूल तालुक्यातील आगडी येथील बाबूराव निकोडे यांचे घराशेजारील विहीरीत पडला. त्यानंतर त्याला विहिरीबाहेर बाहेर पडता न आल्याने त्याचा विहीरीतच मृत्यू झाला. मरण पावलेला बिबट नर जातीचा होता. तो अंदाजे पाच वर्षाचा होता.
आगडी येथील बााबूराव निकोडे हे सकाळी गाईच्या गोठयाकडे गेले असता त्यांना विहीरीत बिबट्या पडल्याचे लक्षात आले. याची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच क्षेत्र सहाय्यक प्रशांत खनके, क्षेत्र सहाय्यक नंदकिशोर पडवे, मुकेश भांदककर, संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, प्रशांत मुत्यारपवार, वनरक्षक अनिल नालमवार हे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा मोका पंचनामा करून मृत बिबटला विहरीतुन काढुन शवविच्छेदन करण्यासाठी चंद्रपूर ला पाठवण्यात आले. शिकारीच्या मागे धावताना बिबट विहिरीत पडला असावा असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.