चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे घरातून रात्रीच्या सुमारास एका सात वर्षाच्या प्रशिल बबन मानकर या मुलाला उचलून नेत बिबट्याने ठार केले होते. या बिबट्याला अखेर सोमवारी (दि.२२) सकाळी अकराच्या सुमारास जेरबंद करण्यात आले. बिबट्याला जेरबंद करण्याची कार्यवाही सिंदेवाही वन परिक्षेत्र कार्यालयाने केली. बिबट्या जेरंबद केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे १८ सप्टेंबरला रात्री साडेसातच्या सुमारास सार्वजनिक गणपतीचा महाप्रसाद खाऊन प्रशिल काकाच्या हाताला धरून घरी परतत होता. यावेळी घराच्या उंबरठ्यावरच अंगणाच्या आडोशाला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याला उचलून नेत हुडकी परिसरात पळ काढला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. रात्रभर पोलिस, वनविभाग व गावकऱ्यांनी परिसर पालथा घातला. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास मृतदेह मिळाला. या घटनेमुळे गावात प्रचंड संताप उफाळून आल्यानंतर पोलिस व वनाधिकाऱ्यांना मृतदेह उचलण्यास नकार दिला. तब्बल आठ तासांच्या मनधरणीनंतर गावातील नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्याचे लेखी निवेदन दिल्यानंतर मृतदेह उचलण्यात आला. शवचिच्छेदनानंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडला. वनविभागाने दिलेल्या लेखी निवेदनानुसार बिबट्यापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढविली.
ट्रॅप कॅमेरे व लाईव्ह कॅमेरे लावून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले. अखेर सोमवारी गडबोरी गावाच्या शेजारी सकाळी अकराचे सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात आले. बिबट्याला जेरबंद कैल्याची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्याला पहाण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. हा बिबट नर जातीचा आहे.
सिंदेवाही वन परिक्षेत्र कार्यालयाने ही कार्यवाही ब्रह्मपुरीचे वनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी, सहायक वनसंरक्षक डॉ. एम. बी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सिंदेवाहीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार (बोरावार) यांच्या नेतृत्वाखालील पथकात भारती बगमारे (वनपरिक्षेत्र अधिकारी नागभीड), बायोलॉजीस्ट राकेश अहुजा, क्षेत्र सहायक एन. टी. गडपायले, एस. बी. उसेंडी, पी. एस. मानकर, आर. जी. कोडापे, तसेच वनपाल बी. डी. चिकाटे, वाय. एम. चौके, आर. एम. सुर्यवंशी, वनरक्षक, STPF सदस्य, RRU टीम, गस्ती पथक, PRT टीम, सॉब नेचर फाउंडेशन व वनमजूर सहभागी झाले होते. सिंदेवाही वनपरिक्षेत्राने या परिसरात ट्रॅप कॅमेरे व लाईव्ह कॅमेऱ्यांच्या सहाय्याने शोधमोहिम पुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना राबविल्या जाणार असल्याचे वनविभागाने सांगितले आहे.