

Kolhapur Jakhale leopard trap camera
कासारवाडी : पन्हाळा तालुक्यातील जाखले गावाजवळ बिबट्याने शिकार करून कुत्र्याला झाडावर लटकवल्याची घटना समोर आली होती. या बिबट्याच्या शोधासाठी वनविभागाने ट्रॅप कॅमेरा लावला होता. या कॅमेराने मंगळवारी (दि.५) रात्री बिबट्याचे स्पष्ट चित्र टिपले आहे.
सोमवारी रात्री गायकवाड हजारे मळ्यातील कुत्र्याची शिकार करून झाडावर लटकवलेला बिबट्या मंगळवारी स्थानिक नागरिक व वनविभागाच्या निदर्शनास आला होता. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. याच पार्श्वभूमीवर वनविभागाने जाखले परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले होते. अखेर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास बिबट्याचा वावर सिद्ध झाल्याने वनविभाग अधिक सतर्क झाला आहे.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी आणि परिसराची पाहणी केली आणि बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. वनरक्षक योगेश पाटील यांनी सांगितले की, या भागात आधीच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी आणि त्याला पकडण्यासाठी वन विभाग सतर्क आहे.
परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आणि पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जाखले परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने शोधमोहीम सुरू केली असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.