Leopard Attack Paddy Plantation Chandrapur
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील उपवनक्षेत्र मिडाळा अंतर्गत जनकापूर परिसरात धान रोवणीच्या कामादरम्यान बिबट्याने अचानक हल्ला करून एका शेतमजुराला जखमी केले. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि.२७) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास अड्याळमेंढा शेतशिवारात घडली.
या घटनेमुळे जनकापूरसह परिसरातील शेतकरी व मजूर वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी मजुराचे नाव सूर्यभान कन्नाके असे असून, सध्या त्यांच्यावर नागभीड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जनकापूर परिसरात सध्या धान रोवणीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. नेहमीप्रमाणे सकाळपासून शेतमजूर शेतात काम करत होते. दुपारनंतर सुमारे चार वाजण्याच्या सुमारास सूर्यभान कन्नाके हे शेतालगतच्या नाल्याकडे शौचासाठी गेले असता झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घालत हल्ला केला.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या सूर्यभान यांनी मोठ्याने आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून जवळच धान रोवणीचे काम करणारे इतर मजूर घटनास्थळी धावून आले. अनेकजण एकत्र येत असल्याचे पाहताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. सहकारी मजुरांनी जखमी सूर्यभान कन्नाके यांना तातडीने नागभीड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच उपवनक्षेत्र अधिकारी तावडे यांनी वनकर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून बिबट्याच्या पाऊलखुणांचा मागोवा घेण्यात आला. तसेच फटाक्यांचे आवाज करून बिबट्याला मानवी वस्तीपासून दूर हाकलण्याचा प्रयत्न करण्यात आला.
धान रोवणीचा हंगाम सुरू असल्याने शेकडो शेतकरी व मजूर दररोज शेतात कामासाठी जात आहेत. अशा परिस्थितीत झालेल्या या हल्ल्यामुळे जनकापूर, अड्याळमेंढा व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. वनविभागाने परिसरात गस्त वाढवून नागरिकांच्या जीवाचे रक्षण करावे, अशी मागणी होत आहे.