चंद्रपूर: पुढारी वृत्तसेवा: चंद्रपूर शहराला लागून असलेल्या दुर्गापूर येथे शौचास गेलेल्या एका चिमुकल्याला बिबट्याने उचलून नेल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे. सदर घटनेची माहिती वनविभागाला तत्काळ दिल्यानंतर त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
चंद्रपूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दुर्गापूर परिसरात वेस्टर्न कॉल फील्ड च्या कोळसा खाणी आहेत. याच परिसराला लागून ऊर्जानगर आहे. या ठिकाणी महाऔष्णिक वीज केंद्र आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल तसेच दुर्गापूरच्या परिसराला लागून घनदाट जंगल आहे. वाघ, बिबट यांचे वास्तव्य या परिसरात नेहमीच आढळून येते. काल सायंकाळी दुर्गापूर येथील एक चिमुकला घराशेजारी शौचास गेला. त्याला बिबट्याने उचलून नेल्याने एका वाहन चालकाने आरडाओरड केल्याने घटना लक्षात आली.
या घटनेची महिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळाकडे गर्दी केली होती. लगेचच पोलिस व वन विभागाला महिती देण्यात आली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन शोधमोहीम सुरू केली. परंतु, रात्र झाल्याने मुलाचा पत्ता लागलेला नव्हता. विशेष म्हणजे या परिसरात बिबट्यांचा वावर आहे. यापूर्वी तीन ते चार मुलांना दुर्गापूर येथूनच बिबट्याने उचलून नेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या घटनेमुळे दुर्गापूर परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या परिसरातील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे, त्यामध्ये मुलगा शौचास गेल्याचे दिसत आहे. बिबट्याने त्याला उचलून नेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आज सकाळपासून पुन्हा पोलीस, वनविभागाने या परिसरात शोध मोहिम सुरू केली असता एक बिबट या परिसरात आढळून आला आहे. काय दिवसापूर्वी चंद्रपूर शहराच्या बिनबागेट परिसरात बिबट्याने हैदोस घातला होता.