चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांनी गोंदेडाच्या सरपंच गिरजाबाई गायकवाड यांना स्कुटी भेट दिली.  Pudhari News Network
चंद्रपूर

प्रेरणादायी : सत्तरीतील गिरजाबाई स्कुटीवरून करणार गावविकास

आमदारांनी दिली सरपंच गिरजाबाईंना स्कुटी भेट

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर: पुढारी वृत्तसेवा : गावविकास करायचा असेल, तर साधनांची गरज आहे. परंतु सर्व साधने स्व:कडे असतील असे नाही. स्वत:कडे साधन नसतानाही 70 वर्षीय गिरजाबाई गायकवाड यांनी गाव विकासासाठी प्रयत्न चालविले आहे. कधी बसने कधी अन्य कुणाच्या तरी वाहनाने चिमूर गाठायचे आणि गाव विकासाचे काम करून जायचे, असा दिनक्रम होता. परंतु आता गोंदेडाच्या सरपंच गिरजाबाई गायकवाड स्कुटीने गावविकासाच्या वाऱ्या करणार आहेत. चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांनी त्यांना एक स्कुटी भेट देऊन गाव विकासासाठी कार्य करण्याची चालना दिली आहे.

गिरजाबाईचे मागील तीन पंचवार्षिकमध्ये नेतृत्व

चिमूर तालुक्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमि म्हणजे गोंदेडा गाव. येथील मागील तीन पंचवार्षिक कालावधीत त्या ग्राम पंचायतीचे नेतृत्व करीत आहेत. सध्या गिरजाबाई गायकवाड सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. तर मागील दहा वर्षात त्यांनी सदस्य पद भूषविले. वयाने 70 वर्षाच्या असूनही गाव विकासाठी त्यांचा पुढाकार वाखाणण्याजोगा आहे. घरी दोन मुले त्यापैकी एकाला नोकरी तर एक शेती करतो. नातू, सुन असा परीवार आहे.

नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करून पाठपुरावा

मागील पंधरा वर्षापासून त्यांनी गावातील नागरिकांच्या विविध समस्या तालुका व अन्य ठिकाणी मांडल्या. त्याचा पाठपुरावा करून समस्यांचे निराकरण करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे त्या अजूनही पदावर कार्यरत आहेत. गाव विकासासाठी असलेल्या त्यांच्या धडपडीनेच त्यांची ओळख निर्माण झाली आहे. तालुक्याच्या ठिकाणी, शासकीय, निमशासकीय कार्यालयात जावून कामे करण्यासाठी त्यांना अनेकदा कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले.

आमदार बंटी भांगडिया यांच्याकडून स्कुटी भेट

गोदेंडा येथून एसटी बसची सुविधा नाही. त्यामुळे त्यांना खासगी वाहनानेच प्रवास करावा लागत होता. स्वत:चे साधने नसतानाही त्यांची गाव विकासाची वारी सुरूच होती. घरी वाहन असावे त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्या नेहमी बापुंकडे मागणी करीता होत्या. बापु म्हणजे चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया. अनेकदा आपली प्रवासाची अडचण त्यांनी बापुंना सांगितली होती. अनेक वर्षांपासूनची त्यांची स्कुटीची मागणी होती. ती मागणी आता पूर्ण झाली आहे. आमदार बंटी भांगडिया यांनी गोंदेडा च्या सरपंच गिरजाबाई गायकवाड यांना दुचाकी स्कुटी भेट दिली आहे.

गिरजाबाईंच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.

दोन दिवसांपूर्वीच ७ जुलैला आमदार महोदयांच्या निवासस्थानी भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया नन्नावरे व सहकारी महिलांच्या उपस्थितीत गिरजाबाईला स्कुटी भेट दिली. त्यामुळे आता नातवाला स्कुटीचा सारथी करून गाव विकासाचा गाढा ओढणार आहेत. बापुंकडून मागणीपूर्ण झाल्याचे समाधान गिरजाबाईंच्या चेहऱ्यावर दिसत होते. यावेळी भाजप महिला आघाडी च्या गीता लिंगायत, आशा मेश्राम, दुर्गा सातपुते, भारती गोडे, विना जिवतोडे, प्रतिभा गेजिक, ललिता चौधरी तसेच युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालू पिसे, भाजप शहर अध्यक्ष सचिन फरकाडे युवा मोर्चा शहर महामंत्री श्रेयस लाखे, माजी जिप सदस्य विलास डांगे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दिनकर शिनगारे आदींची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT