चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा
ग्रिल कन्स्ट्रक्शन कंपनीने रस्त्याच्या बांधकामाकरीता लागणारे दगड, माती, मुरूमाचे अवैद्य उत्खनन कोरपना तालुक्यातील पगडीगुड्डम धरणाच्या सांडव्यामधून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासकिय मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने पाटबंधारे विभागाने थेट कोरपना पोलिस ठाण्यात कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवर पोलिस विभाग कोणती कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्याला जोडणारा महामार्ग राजुरा गोविंदपुर 335 बी चे काम सुरू आहे. या महामार्गाकरीता दगड, माती मुरूमाची आवश्यकता आहे. या महामार्गाचे काम ग्रील कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीला मिळाले आहे. याच तालुक्यात पगडीगुड्डम धरण आहे. या धरणाच्या सांडव्यामधील दगड, माती, मुरूमाचे अवैद्य उत्खनन करून रस्याच्या कामाकरीता वापर केला आहे. चक्क धरणाच्या सांडव्यातील उत्खनन करण्यात आल्याची बाब उघडकीस आल्यानंतर पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्या माहितीवरून पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता टेकाम यांनी पगडीगुड्डम धरणात जावून पहाणी केली. सांडव्यात उत्खनन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जे उत्खनन करण्यात आले त्याकरीता पाटबंधारे विभागाची कोणतीही मंजूरी घेण्यात आलेली नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
कोरपना पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ८०० ते ९०० मिटर लांब व ५० मि. रुंद, २-३ मिटर खोल खड्डे सांडव्यात खोदण्यात आले आहे. परवानगी न घेता चोरीने मुरुम-दगड-माती रत्याच्या कामाकरीता वापरण्यात आले आहेत. जागेवर केलेल्या पहाणीत पोकलेन मशीनव्दारे उत्खनन सुरू असल्याने आढळून आले. तसेच हायवा वाहन क्रं एम एच 32, बि झेड 3856 त्या ठिकाणी माल वाहून नेण्याकरीता उभा असल्याचे दिसून आले. पाटबंधारे विभागाची कोणतेही परवानगी न घेता बेकादेशिर उत्खनन करण्यात आले. त्यामुळे कंपनीवर कार्यवाही करून पोकलेन मशिन व ट्रक ताब्यात घेण्याची मागणी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून करण्यात आली आहे. पावसाळा तोंडावर असताना कंपनीने बेकायदेशीर उत्खनन केल्याने संभाव्य पूरस्थिती निर्माण होऊन हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तक्रारीतून म्हटले आहे. शासकिय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या ग्रिल कन्स्ट्रक्शन कंपनी विरोधात गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याची मागणी पाटबंधारे विभागाने तक्रारीतून केली आहे.
या पूर्वी एप्रिल 2024 महिण्यात अशाच प्रकारे उत्खनन करण्यात आले होते. त्यावेळी उत्खनन केल्याचा अहवाल पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी जिल्हाधिकारी तथा वारिष्ठ कार्यालयाला दिला होता. त्यावेळी याच कंपनीने चुकीने नुकसान झाल्याचे कबूल करून यापुढे उत्खनन करणार नाही व गतिनियंत्रक भिंतीचे झालेले नुकसान कंपनीच्या वतीने करून देण्याची हमी दिली होती. परंतु अद्याप कोणतीही नुकसान भरून देण्यात आलेली नाही. त्यानंतर पुन्हा त्याच कंपनीने अवैद्य उत्खनन करून दगड, माती, मुरूम रत्याकरीता वापर केल्याने शासकिय मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने थेट कोरपना पोलिस ठाण्यात कंपनीविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पोलिस व जिल्हा प्रशासन या प्रकरणात काय? कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.