Heavy damage to summer paddy crops due to hailstorm and gale in Nagbhid
चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा
काल (गुरूवार) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या गारपिटीने नागभिड तालुक्यातील चिंधीचक, चिंधीमाल, तळोधी (बा), उश्राळमेंढा परिसरात उन्हाळी धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन हातात येणारे पिकच अस्मानी संकटाने जमिनदोस्त केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाचे तात्काळ उन्हाळी धानपिकांच्या नुकसानी पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी उन्हाळी धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, मुल, सावली, गोंडपिपरी व पोंभूर्णा तालुक्यात धानपिकांची लावगड केली जाते. यावेळी खरीप हंगामात प्रचंड तुट आल्यानंतर शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपिकांकडे लक्ष केंद्रीत केले होते. नागभिड, सिंदेवाही, तालुक्यात मोठ्या प्रमाणात सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी बारीक व ठोकळ धानपिकांची लागवड केली होती. रब्बी हंगामात म्हणजे उन्हाळी धानपिकांची नागभिड तालुक्यात यावेळी जानेवारी, फेब्रुवारी महिण्यात लागवड करण्यात आली. चार महिण्याचा कालावधी होत असताना उन्हाळी धानपिक हातात येण्याची आशा होती, परंतु अस्मानिक संकटाने शेतकऱ्यांचा घात केला आहे.
ऐन तोंडचा घासच काल गुरूवारी रात्री आठ साडेआठच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसाने हिरावला आहे. चिंधीचक व तळोधी बाळापूर परिसरातील उश्राळमेंढा, गंगासागर हेटी, आकारपूर, सावर्ला शेतशिवारात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडला. सोबतच गारपिटही मोठ्या प्रमाणात झाल्याने धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धान काढणीला आला असताना बोराच्या आकाराच्या पडलेल्या गारपिटीने धानाचे कबंरडले मोडले आहे. धान मोठ्या प्रमाणात खाली झडले आहे. पिक खाली लोळले आहे. तब्बल अर्धा ते पाऊन तास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. सोबत गारपिठही झाल्याने शेतकरी भयभित झाला आहे.
मागील खरीप हंगामात किडींमुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. पिकांत प्रंचड घट आली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थीक नुकसानीला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांच्या संसाराचे बजेट कोलमडले. त्यानंतर शेतकऱ्यांनी खचून न जाता उन्हाळी धानपिकाची लागवड करण्याची तयारी सुरू केली. जानेवारी ते फेब्रुवारी महिण्यात नागभिड तालुक्यात सिंचन व्यवस्था असलेल्या शेकऱ्यांनी बारीक ठोकळ हलक्या जातीच्या उन्हाळी धानपिकाची लागवड केली. लागवडीला साडेतीन महिण्याचा कालावधीत होत असताना शेतकऱ्यांनी पिकाची निगा राखली.
पंधरवाड्यात हातात पिक येण्याची शक्यता असतानाच काल गुरूवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने उन्हाळी धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 70 ते 80 टक्के उन्हाळी धानपिकांचे गारपिटीने जमिनदोस्त झाले आहे. तसेच काही प्रमाणात घरांचेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे. या परिसरात अवकाळी पाऊस येत असल्याने उरले सुरले पिकही हातातून जाण्याची भिती शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
खरीप हंगामात दरवर्षीच शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पडत आहे. कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाने शेतकरी पुरता कमकुवत होत आहे. अंगावर कर्जाचे ओझे चढत आहे. कर्ज फेडणे शेतकऱ्यांना डोईजड जात आहे. अशाही परिस्थीतीमध्ये सिंचन सुविधा असलेले शेतकरी उन्हाळी धानिकाची लागवड करीत आहेत. खरीपापेक्षा उन्हाळी धानपिकांमध्ये जास्त उत्पादनाची आशा असते. परंतु पिकाच्या लागवडीकरीता दुप्पटीने खर्च होतो. नांगरटी, चिखलटी, रोवणी, पऱ्हे हंगाम, खत, निंदा, धानपिक कापणी, मळणी तसेच किटकनाशके आदींवर होणारा खर्च एकत्र केला तर दुप्पटीने उन्हाळी धानपिकावर खर्च झालेला आहे. शेतकऱ्यांना उन्हाळी पिकाची लागवड करण्यास कर्जाची सुविधा नाही. त्यामुळे कर्ज किंवा उसणवारे घेऊन पैशाची जमवाजमव करून खर्च करावा लागतो आहे. काही शेतकरी त्यांच्याकडे असलेले दागिने गहाण ठेवणू उन्हाळी पिकांची लागवड करतात.
चिंधीचक व चिंधीमाल शेतशिवारात झालेलया वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन हातात येणारा शेतकऱ्याच्या तोंडातील घासच अस्मानी संकटाने हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे झालेले नुकसान कधीही भरून निघणारी नाही. गारपिटीमुळे सुमारे 70 ते 80 टक्के धान जमिनीवरती झडलेले आहेत. उन्हाळी धानपिक लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ मदतीची गरज आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनानी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी चिंधीचक ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रदीप समर्थ यांनी केली आहे.