Heat Wave Chandrapur  Online Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Heat Wave Alert | चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

21 मेरोजी ऑरेंज अलर्ट; 22 ते 24 मे दरम्यान यलो अलर्ट जारी

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur weather news

चंद्रपूर : विदर्भासह चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 21 मे रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट तर 22 ते 24 मे दरम्यान काही ठिकाणी उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता वर्तवित यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

उन्हाचा तीव्र तडाखा लक्षात घेता नागरिकांनी विशेषतः दुपारी 12 ते सायंकाळी 4 या कालावधीत घराबाहेर पडणे टाळावे, असे प्रशासनाने म्हटले आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय उन्हात फिरणे टाळावे तसेच बाहेर पडताना डोक्यावर टोपी, छत्री, पांढरा शेला किंवा दुपट्टा वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असल्याने नागरिकांनी नियमित पाणी पिण्याची सवय ठेवावी. तहान लागली नसली तरी दर अर्ध्या तासाने पाणी प्यावे. तसेच ओआरएस, लिंबूपाणी, ताक, लस्सी यांसारखे द्रवपदार्थ सेवन करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाने नागरिकांना हलके, सच्छिद्र आणि पांढऱ्या रंगाचे सूती किंवा खादीचे कपडे वापरण्याचा सल्ला दिला आहे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर करावा तसेच रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवाव्यात. कुलर, पंखे किंवा वातानुकूलन यंत्रांचा योग्य वापर करून उष्णतेपासून बचाव करावा, असेही सांगण्यात आले आहे.

गरोदर महिला, वृद्ध आणि लहान मुलांची विशेष काळजी आवश्यक

उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक परिणाम गरोदर महिला, वयोवृद्ध, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांवर होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिळे अन्न खाणे टाळावे तसेच उच्च प्रथिनयुक्त पदार्थांचे अति सेवन करू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दुपारच्या वेळेत श्रमाची कामे शक्यतो टाळावीत. उन्हात काम करावे लागल्यास चेहरा आणि डोके ओल्या कापडाने झाकावे. कामगारांना थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवण्याच्या सूचना संबंधित आस्थापनांनी द्याव्यात, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

चक्कर, अस्वस्थता जाणवल्यास तातडीने उपचार घ्या

उष्णतेमुळे चक्कर येणे, अशक्तपणा, डोके दुखणे किंवा अस्वस्थ वाटल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उष्माघात झालेल्या व्यक्तीस विलंब न करता जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय पाळीव प्राणी आणि गुरेढोरे यांनाही सावलीत ठेवून त्यांना पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे, असेही प्रशासनाने सांगितले आहे. दुपारच्या वेळेत मद्य, चहा, कॉफी तसेच कार्बोनेटेड शीतपेयांचे सेवन टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

नागरिकांनी हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची तसेच कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन, चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT