Nagpur Women Arrested Bus Stand Robbery Case
चंद्रपूर : बसस्थानक व परिसरातून प्रवाशी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबविणाऱ्या महिलांच्या टोळीचा मुल पोलिसांनी पदार्फाश केला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन महिलांकडूनर सुमारे अडीच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून बसस्थानक परिसरात महिला येऊन बस मध्ये बसणाऱ्या महिलांच्या गळ्यातील ऐवज चोरी करीत होत्या. दोन्ही महिला नागपूर येथील रहिवासी आहेत.
६ मे रोजी सकाळी अकराचे सुमारास मुल बस स्थानकावर बसमध्ये चढताना प्रवाश्यांच्या गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचा 10 ग्रॅमचा गोप अज्ञात चोरट्यांनी लांबविला होता. सदर प्रकरणाची फिर्यादीने मुल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मुल पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. पोलिसांनी बस स्थानक परिसरात सतत पाळत ठेवून होते. 30 मे ला पोलिसांची गस्त सुरू असताना बसस्थानक परिसरात दोन महिला संशयास्पद स्थितीत आढळून आल्या.
जमुना हितेश उर्फ संदिप नाडे उर्फ वाघमारे (वय ३५), लक्ष्मी जगनु मानकर (वय ४०, दोघी रा. रामेश्वरी टोली, नागपूर) यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची कौशल्यपूर्ण व तांत्रिक पध्दतीने चौकशी केली असता सदर दोन्ही महिला विरोधात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती तसेच हैदराबाद येथील विविध पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातंर्गत बस स्थानक परिसरात प्रवाश्यांचे सोन्याचे दागिने चोरी केल्या प्रकरणी अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन झाले. सदर महिलांची कसून चौकशी केली असता ६ व २० मे रोजी मुल बस स्थानकावरुन प्रवाशी महिलांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून अडीच लाखांचे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात सपोनि सुबोध वंजारी यांचे नेतृत्वात पोउपनि भाऊराव बोरकर, भोजराज मुडरे, जमीरखान पठाण, चिमाजी देवकते, नरेश कोडापे, सीमा निषाद यांनी या प्रकरणाचा तपास करून सोन्याचे ऐवज लांबविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.