स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने मोठी कारवाई  Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Crime | गडचांदूरजवळ कत्तलीसाठी नेणाऱ्या ५२ जनावरांची सुटका; दोन ट्रकसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरची कारवाई; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

अविनाश सुतार

Illegal Cattle Transport Gadchandur

चंद्रपूर : गडचांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गोवंशीय जनावरांची वाहतूक उघड करत स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने मोठी कारवाई केली. नाकाबंदी दरम्यान दोन ट्रक पकडून त्यातून ५२ जनावरांची सुटका करण्यात आली असून सुमारे ४० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बुधवारी (दि. ८) स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील भोयगाव रोडवर विशेष नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान संशयित ट्रक (क्रमांक CG-04-PQ-7579) तसेच दुसरे जडवाहन अडवून त्यांची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान दोन्ही ट्रकमध्ये एकूण ५२ गोवंशीय जनावरे (बैल, गाय व गोरे) अमानुष पद्धतीने कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळून आले. यामध्ये तीन जनावरे मृत अवस्थेत असल्याचेही निदर्शनास आले.

या प्रकरणी आरोपी सादिक कुरेशी (रा. गडचांदूर) तसेच दोन्ही ट्रकचे चालक यांच्याविरुद्ध गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायदा १९६० अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५२ गोवंशीय जनावरे तसेच दोन ट्रक असा एकूण अंदाजे ४० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली  स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक दीपक कॉक्रेडवार, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे तसेच स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, किशोर वैरागडे, प्रमोद डंभारे, गोपीनाथ नरोटे व वृषभ बारसिंगे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT