Former Sarpanch killed in Tiger Attack
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात पुन्हा एकदा वाघाने हल्ला करून शेतकऱ्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चिमूर वनपरिक्षेत्राच्या शंकरपूर उपवन क्षेत्रातील डोमा बीट हद्दीत असलेल्या शिवरा गावाजवळ रविवारी (दि. २६ ) सायंकाळी ही घटना घडली. नीलकंठ भुरे (वय ६०, रा. शिवरा) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ते गावाचे माजी सरपंच होते. विशेष म्हणजे, एका महिन्याच्या कालावधीत परिसरात वाघाच्या हल्ल्याची ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये मोठी भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलकंठ भुरे हे रविवारी सायंकाळी चार ते पाच वाजताच्या सुमारास आपल्या शंकरपूर-चिमूर रोडलगत असलेल्या शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र ते घरी परतले नाहीत. रात्री उशिरापर्यंत ते परतले नसल्याने कुटुंबीयांनी त्यांच्या शोधासाठी शेतावर मोहीम हाती घेतली.
शेतात गेल्यावर त्यांची सायकल मात्र शेताच्या कडेला उभी असल्याचे दिसून आले, परंतु व्यक्तीचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे गावकऱ्यांना संशय आला. गावातील सुमारे ३० ते ४० नागरिकांना घेऊन दुसऱ्यांदा रात्री शेतात शोधमोहीम सुरू करण्यात आली. अखेर रात्री अकराच्या सुमारास नाल्याजवळ त्यांचा मृतदेह सापडला.
वाघाने भुरे यांच्यावर शेतातच हल्ला करून त्यांना ठार मारले होते. मृतदेह नाल्याजवळ ओढत नेण्यात आला होता आणि दोन्ही पाय खाल्लेल्या अवस्थेत आढळून आल्याने घटना अत्यंत भीषण स्वरूपाची होती. या घटनेची माहिती मिळताच चिमूर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर, वनक्षेत्रपाल यु.बी. लोखंडे, वनरक्षक बुरले तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते.
तसेच भिसी पोलीस ठाण्याचे ठाणेदार मंगेश भोंगाडे, पोलीस उपनिरीक्षक भारत थीटे, पोलीस हवालदार सुनील घोडमारे व पोलीस शिपाई विकास लांजेवार हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजुकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती रोशन ढोक, तसेच शिवरा ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल नन्नावरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी तात्काळ भूमिका घेत वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येईपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी नेऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाला होता. अखेरीस चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर हे सोमवारी पहाटे दीडच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून वाघाचा बंदोबस्त करण्यात येईल व मृतकाच्या कुटुंबाला शासनाच्या नियमांनुसार आर्थिक मदत दिली जाईल असे आश्वासन दिले.
अधिकाऱ्यांनी मृतकाच्या कुटुंबाला तत्काळ ३० हजार रुपये नगद तर ९ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश देऊन मदतीचा हात दिला. त्यानंतर ग्रामस्थांचा संताप शांत झाला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.
शिवरा परिसरात गेल्या महिन्यातच आणखी एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले होते. आता पुन्हा अशा प्रकारची घटना घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी वर्गामध्ये “शेतात काम करणे धोकादायक झाले आहे” अशी भावना व्यक्त होत असून, वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पिंजरे बसवून तातडीने वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, परिसरात ड्रोन व पथकांद्वारे गस्त वाढवावी,शेतकऱ्यांना सुरक्षिततेसाठी विशेष योजना राबवावी, मृतकाच्या कुटुंबाला कायमस्वरूपी आर्थिक मदत व नोकरी देण्यात यावी आदी मागण्या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.