चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील शिवरा येथील शेतकरी नीलकंठ भुरे यांना त्यांच्या शेतातच वाघाने ठार केल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थांनी वन विभागाला वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी एक दिवसाची मुदत दिली होती. मात्र, दिलेल्या वेळेत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज मंगळवारी (दि.28) सकाळी नऊ वाजता कान्पा शंकरपूर चिमूर या राज्य महामार्गावरील शिवरा फाटा येथे तीन तासांचा रस्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे राज्यमार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन “वाघ पकडा, शेतकरी वाचवा” अशा घोषणा देत प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला.
चिमूर तालुक्यातील शंकरपूर, शिवरा, आंबोली, गडपिपरी, पुयारदंड, कवडशी, चिचाळा, लावारी या गावांमध्ये वाघाने महिनाभरात दहशत माजवली आहे. एका महिन्यात दोन शेतकऱ्यांचा बळी आणि मागील पंधरा दिवसांत बारा पाळीव जनावरांचा बळी वाघाने घेतला आहे. या भीतीमुळे शेतकरी शेतात जाण्यास टाळाटाळ करत आहेत, तर शेतमजूरही शेतात काम करण्यास तयार नाहीत. परिणामी कापूस वेचणी आणि धान कापणीचे काम ठप्प झाले आहे.
आज मंगळवारी चिमूर शंकरपूर कान्पा या राज्य मार्गावर रस्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर यांनी केले. त्यांच्यासोबत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय गावंडे, माजी उपसभापती स्वप्नील मालके, माजी पंचायत समिती सदस्य राजू कापसे, माजी उपसभापती रोशन ढोक, बसपचे सूर्योदन घूटके, वंचित बहुजन आघाडीचे शुभम मंडपे, शिवरा सरपंच अतुल ननावरे, शंकरपूरचे उपसरपंच अशोक चौधरी तसेच परिसरातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर यांनी उपस्थितांशी चर्चा केली. त्यांनी वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी चार दिवसांचा वेळ मागितला आणि या कालावधीत वाघाला पकडले जाईल, असे आश्वासन दिले. त्यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. तथापि, चार दिवसांच्या आत वाघ न पकडल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिमूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिनेश लबडे आणि भीसी पोलीस ठाण्याचे ठाणेदार मंगेश भोंगाडे हे पथकासह घटनास्थळी उपस्थित होते.
वन विभागाने वाघाच्या शोधासाठी एक लाईव्ह कॅमेरा, १६ ट्रॅप कॅमेरे व ३५ वनकर्मचारी तैनात केले आहेत. वाघाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून त्यासाठी पाळीव जनावर बांधून मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी चार चमू तैनात करण्यात आले असून त्यातील तीन चमू गाव व शेत परिसरात गस्त घालत आहेत, तर एक चमू वाघाचा मागोवा घेत आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर यांनी दिली.