Heat Wave File Photo
चंद्रपूर

विदर्भात उष्णतेचा कडेलोट; 45°C पार तापमानानंतर मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

अकोला-वर्ध्यात उष्ण लहरींचा तडाखा, पुढील दोन दिवसांत वादळी पावसाची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

Extreme Heat in Vidarbha; Warning Issued for Rain with Thunderstorms After Temperatures Cross 45°C

चंद्रपूर | पुढारी वृत्तसेवा 

राज्यातील विदर्भ भाग सध्या तीव्र उष्णतेच्या लाटेखाली होरपळत असून अकोला व वर्धा येथे तापमानाने तब्बल 45 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असताना दुसरीकडे हवामान खात्याने पुढील दोन दिवसांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हवामान खात्याच्या आजच्या ताज्या नोंदीनुसार विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. अकोला आणि वर्धा येथे सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून त्यापाठोपाठ नागपूर येथे 44.4 अंश, तर अमरावती येथे 44.2 अंश तापमान नोंदवण्यात आले आहे.

गोंदिया येथे 43.5 अंश, ब्रह्मपुरी येथे 43.2 अंश तापमानाची नोंद झाली असून भंडारा येथे 43, चंद्रपूर येथे 42.4 अंश आणि बुलढाणा येथे 41.2 अंश तापमान नोंदले गेले आहे. या सतत वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिकांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, हवामान खात्याने 20 एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यासाठी उष्ण लहरींचा इशारा जारी केला आहे. त्याचबरोबर 20 व 21 एप्रिल या दोन दिवसांत अकोला, अमरावती, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अशा प्रकारे विदर्भात एकीकडे उष्णतेचा कडाका तर दुसरीकडे अचानक वादळी पावसाची शक्यता अशी दुहेरी परिस्थिती निर्माण झाली आहे. या बदलत्या हवामानामुळे शेतीसह दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे, पुरेसे पाणी पिण्याचे आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT